नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : नेरूळ सेक्टर 1 शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाणपूल येथे उतरताच पूर्व बाजूस छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाला महराजांचे नाव देण्यात आले असले तारी या चौकात कोठेही महाराजांचे अस्तित्व दिसून येत नव्हते.या चौकात येणारे नागरिक अनेकदा संभ्रमात पडून शिवाजी महाराजांची मूर्ती कोठे आहे? हे विचारताना दिसत होते. मात्र आता हा संभ्रम लवकरच दूर झाला आहे. गेली अनेक वर्ष भाजपाचे समाजसेवक देवनाथ म्हात्रे या मूर्तीसाठी पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्यातून या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसविण्यात आली आहे. चौकाची सजावट झाली आहे. पालिकेला शिवरायांच्या मूर्तीच्या उद्घाटनाचा मुहूर्त मिळेनासा झाला आहे. आगामी निवडणुका पाहता उद्घाटनाच्या श्रेयात शिवराय अडकल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.सकल मराठा समाज, तसेच मनसेने नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा देखील पालिकेला दिला आहे.
सायन पनवेल महामार्गावरून नवी मुंबईत शिरण्यासाठी नेरूळ येथे एलपी चौक प्रसिद्ध आहे. या चौकातून आत येताच शिरवणे येथे डी. वाय पाटील कोलेजसमोर काही अंतरावर चौक आहे. या चौकाचे नामकरण जरी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे झालेले असले तरी या चौक महाराजांच्या नावावे ओळखला जावा अशी काहीच ओळख नव्हती. ही बाब सातत्याने शिव प्रेमींना सतावत होती. या चौकाबाबत संभ्रम निर्माण होत होता. या चौकात मेघडंबरी उभारून त्यात महाराजांची मूर्ती उभारण्याऐवजी दगडांचे शिल्प उभारले गेले होते. त्यामुळे शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत होते. या शहरात नव्याने येणाऱ्या नागरिकांचा पत्ता विचारताना संभ्रम वाढू लागला होता.
अनेकदा राज्यातून येणारे नागरिक शिवाजी महाराज चौक शोधण्यास सुरुवात करत असत. मात्र सेक्टर1मध्ये येऊनही महाराजांचा पुतळा नसल्याने किंवा तशी कोणतीही खूण नसल्याने अनेक नागरिकांची पत्ता शोधताना धांदल उडत होती. त्यामुळे या चौकातच असलेले डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ हेच या भागाची ओळख बनलेले होते. त्यामुळे चौकाची उरली सुरली ओळख फक्त पत्ता लिहिण्यापूर्ती राहिली होती. मात्र आता या चौकात साजेसा असा छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसवली गेली असल्याने या चौकाला, शहराला देखील शोभा आली आहे.
साधारण 10 ते 12 फुटांचा सिंहासनारूढ मूर्ती आहे. मूर्ती उभारणार्या संस्थेने मूर्तीचे क्ले मॉडेल तयार केले होते. कला संचालनालयाची मान्यता घेत मॉडेलप्रमाणेच मूर्ती उभारण्याची दक्षता घेण्यात आली आहे. एखादी मूर्ती उभारताना त्याच्या दोन की. मीच्या त्रिज्येच्या परिसरात दुसरी मूर्ती उभारलेली नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार नेरूळ सेक्टर १ येथील चौकात नव्याने बसवली जाणारी मूर्ती शासनाच्या सर्व निकषांमध्ये बसली असून सर्व परवानग्या पालिकेला मिळाल्या आहेत.मात्र राजकारण्यांच्या उद्घाटनाच्या श्रेयापायी मात्र शिवराय उद्याच्या फेऱ्यात अडकले आहेत.
महाराजांची मूर्ती उभारली जाणार असली तरी त्याला शोभेसे असे वातावरण पालिकेने याआधीच चौकात तयार करून ठेवल्याचे दिसून येत आहे. चौकाच्या लगतच्या दुभाजकांवर शिवकालीन तटबंदी तयार करण्यात आली आहे. तसेच मेघडंबरीभोवती मातीचे मावळे उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या हातात भाले तसेच शिवकालीन शस्त्र दिलेली आहेत. त्यासह शिवकालीन तोफा ठेवण्यात आल्याने हे चित्र कोणालाही भारावून टाकेल असेच दिसत आहे. मात्र त्यात शिवराय विराजमान होण्याची प्रतीक्षा कायम आहे.






