सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मशिदीवरील भोंगे उतरवा, हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखाविण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्देश नाही. राजसाहेब ठाकरे यांचे भाषण समजावून न घेताच त्यांच्या नावाने गळा काढला जातोय. पुरोगामीत्वाचा डंका पिटणारेच भोंग्याचे राजकीय भांडवल करून जाती-जाती, धर्मा-धर्मामध्ये भांडणे लावत आहेत. महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण गढूळ करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केला.
यावेळी विलास कांबळे, विकास मगदूम, संदीप टेंगले, जमीर सनदी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले ” विशिष्ठ समाजाच्या मतांसाठी हे लांगूलचालन सुरु आहे, मशिदीवरील भोंग्या बाबत मनसेची भूमिका स्पष्ट आहे. आमचा अजानला विरोध नाही. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचविण्याचा उद्देश नाही. त्यांच्या पार्थनेला हरकत नाही. राज साहेब यांच्या आवाहनानंतर मुस्लिम समाजाने स्वतः काही ठिकाणचे भोंगे खाली उतरवले आहेत. आवाज कमी केला आहे. सरकारही काही मार्गदर्शक नियमावली तयार करत आहे. मात्र काही जणांकडून जाणीवपूर्वक मनसेच्या भूमिकेबद्दल संशयकल्लोळ निर्माण केला जात आहे.
रमजान ईदचा सण झाल्यानंतर मनसेच्या वतीने सांगली शहरात मारुती मंदिरासमोर महाआरती करण्यात येणार आहे. पक्षातील मुस्लिम पदाधिकरी, कार्यकर्तेच महाआरती करतील. त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. तत्वपूर्वी मनसेच्या वतीने सांगलीत इफ्तार पार्टीचेही आयोजन करण्यात येणार आहे. मुस्लिम समाजामध्ये मनसेबद्दल विष पेरले जात आहे. हे सर्व मतांसाठी सुरु आहे. पण मुस्लिम समाज लबाडांच्या या धूर्त राजकारणाला बळी पडणार नाही, असेही सावंत म्हणाले.
जयंत पाटील यांनाच दंगल घडवायची
जयंत पाटील यांनाच सांगलीमध्ये जातीय दंगली घडवायच्या आहेत. स्वतःच्या मुलाला त्यांनी सांगलीत उमेदवारी मागितली आहे, म्हणूनच त्यांना दंगल घडवून स्वतःच्या मुलाला आणायचे आहे, असा आरोप ही सावंत यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी राज ठाकरे व मनसेची बदनामी थांबवावी, अन्यथा राज ठाकरे यांची सभा घेऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जातीयवाद यांच्यामध्येच ठासून भरला
एकीकडे पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे जाती-जाती, धर्मा-धर्मामध्ये भांडणे लावायची असा एककलमी कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून सुरू आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर या महामानवांची नावे घायची आणि जातीयवादाला खतपाणी घालायचे असे बोगस धंदे सुरु आहेत. जातीयवाद यांच्या मधेच ठासून भरला आहे. इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल अनुहार काढले. त्या समाजाच्या भावना दुखावल्या व्यापीठावर बसलेले जयंत पाटील व धनंजय मुंडे यावर दात काडत होते. हे कशाचे लक्षण आहे ? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
सांगलीची भाजप म्हणजे जेजेपी
हिंदुत्व आणि भोंगा संदर्भात राज्यातील भाजपचे नेते आपली भूमिका मांडत आहेत, मात्र सांगलीतील भाजप याबाबत शांत का आहे ? की सांगलीतील भाजप जयंत पाटील यांच्यासोबत काम करतात. सांगलीत जयंत जनता पार्टी (जेजेपी) आहे, हे स्पष्ट होत आहे, सांगली भाजपने आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी.






