फोटो - टीम नवराष्ट्र
बारामती: राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी सर्व नेत्यांचे दौरे आणि बैठका वाढल्या आहेत. बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बारामतीला नवीन ‘दादा’ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. महिला शहराध्यक्षांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या लोकोपयोगी कामांचा उल्लेख केले. तसेच आणखी विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देखील युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले.
महिलांचे नोकरीचे प्रश्न मार्गी लावू
कार्यक्रमामध्ये युगेंद्र पवार यांना महिलांनी औक्षण करुन राख्या बांधल्या. यावेळी युगेंद्र पवार यांच्या मार्फत बारामती शहरातील सुमारे दोन हजार महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला. युगेंद्र पवार म्हणाले, महिलांना सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे अधिक ताकदीने प्रयत्न केले जातील. महिलांना काम धंदा व व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध संस्थांचे आपण मार्गदर्शन घेऊ. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक ध्येय धोरणे आखली आहेत. पवार साहेबांनी बारामतीमध्ये एमआयडीसी आणून विविध व्यावसायिक कंपन्या बारामतीमध्ये आणल्या आहेत. त्यामध्ये महिलांना समान संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण महिलांचे नोकरीचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू, असे मत युगेंद्र पवार यांन व्यक्त केले.
बारामती विधानसभाही रंगणार
मागील महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती मतदारसंघाची चर्चा देशभर रंगली होती. बारामतीमध्ये लोकसभा निवडणूकीवेळी पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार होते. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये मोठा संघर्ष आणि राजकीय टोलेबाजी करण्यात आली. लोकसभेची निवडणूक गाजवत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर आता राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये विधानसभा रंगणार आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभेला देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.