त्या घटनेवरून अमोल कोल्हेंचा महायुतीवर घणाघात
काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनीही आज या पुतळ्यावरून महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. शिवाजी महाराजांचा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, असा घणाघात त्यांनी केला.
हेही वाचा-Manipur Attack : मणिपूरमध्ये उग्रवाद्यांचा CRPF कॅम्प, पोलीस ठाण्यावर हल्ला; घरं पेटवली, ११ ठार
शाहिस्तेखानाने कित्येक महिने स्वराज्यात ठाण मांडून होता, त्याने स्वराज्यात लूट माजवली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि एकदा नाही तर दोनवेळा सुरत लुटली. सुरतेच्या लुटीतून मिळालेल्या खजिना सिंधुदुर्गातील कुरटे बेटावर किल्ला उभारण्यासाठी महाराजांनी वापरला. सुरत लुटून महाराजांनी सिंधुदुर्गचा किल्ला उभारला मात्र देवेंद्र फडणवीस वेगळा इतिहास सांगतात.
महाराजांनी सुरत लुटून सिंधुदुर्गात किल्ला उभारला. आता इतिहास बदलला. दिल्लीतील गुजरात्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लुटले. मात्र सिंधुदुर्गातील किल्ल्यात भ्रष्टाचार झाला तेव्हा तो महाराजांना सुद्धा रुचला नाही. पुतळा कोसळला. हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या घटनेचा महायुती सरकारला जाब विचारला पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होतं. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मात्र 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमधून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला होता. विरोधकांकडून महायुती सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं.
उतळा उभारणाऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी सरकारडून वाऱ्याचा वेग असल्यामुळे पुतळा कोसळल्याचं कारण देण्यात आलं होतं. सरकारने दिलेल्या या कारणावरून तर राज्यभरातून त्यांच्यावर अधिकच टीकेची झोड उठली होती. देशपातळीवर हा मुद्दा उपस्थित झाला होता. विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असून त्याचे पडसाद आता निवडणुकीच्या प्रचारातही उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी आज या पुतळ्यावरून महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शिवाजी महाराजांचा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, असा घणाघात त्यांनी केला आहे.