आता दररोज 600 टनांहून अधिक कचऱ्याचे होणार व्यवस्थापन (फोटो सौजन्य-X)
कल्याण-डोंबिवली : नागरी स्वच्छतेला चालना देण्यासाठी आणि रहिवाशांसाठी जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने कचरा व्यवस्थापन उपाययोजनांमध्ये आघाडीवर असलेल्या सुमीत एल्कोने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) सोबत अधिकृत भागीदारी केली.यावेळी महाराष्ट्रातील पहिला संपूर्णपणे एकात्मिक शहर स्वच्छता व कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या मोठ्या प्रमाणावर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात संपूर्ण कचरा मूल्य साखळी अंतर्भूत आहे. त्यामध्ये संकलन, वाहतूक, वर्गीकरण, कचऱ्यापासून ऊर्जा आणि बायो CNG निर्मिती यांचा समावेश आहे आणि हे सर्व राज्यातील शाश्वत स्वच्छतेसाठी नवा मापदंड निश्चित करतील.
या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि KDMC अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. या उपक्रमाचा कालावधी 10 वर्षांचा असून सर्वसाधारणपणे आजवर वापरल्या जात असलेल्या पारंपरिक टिपिंग फी मॉडेलला पर्याय म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘इनिशियल अॅग्रिड कोट’ मॉडेलनुसार राबवला जाणार आहे. कार्यक्षमतेच्या अनुषंगाने अधिक वाजवी खर्च आणि जबाबदारी यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.
सुमीत एल्को कंपनी सोमवार, 19 मे 2025 पासून महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये एक आठवड्याकरिता (19 ते 25 मे) ITAC (इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग) मॉडेल लागू करेल. त्यानंतर 26 मे 2025 पासून हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल. या प्रकल्पाअंतर्गत दररोज 600 टनांहून अधिक कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाईल आणि त्यासाठी 350 हून अधिक विशेष वाहनांचा ताफा वापरला जाईल. त्यात वर्गीकृत विभागांसह LMV टिपर्स, बॅटरीवर चालणारी वाहने आणि हुक लोडर्स यांचा समावेश आहे. घरोघरी जाऊन केले जाणारे संकलन 4.5 लाख घरे आणि 50000 हून अधिक व्यावसायिक आस्थापना याठिकाणी कचरा संकलन केले जाईल. यासाठी विशेष CSS टीम्स आणि 200 हून अधिक RC कंटेनर्स वापरले जातील. ते झोपडपट्टी व चाळींच्या भागांमध्ये सेवा देतील.
“कल्याण-डोंबिवली महापालिकेसोबत या महत्त्वाकांक्षी उपक्रमात भागीदारी करणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. स्वच्छता ही निरोगी, उत्साही आणि पर्यावरणपूरक समुदायांची पायाभूत गरज आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. कल्याण-डोंबिवलीतील या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ तात्कालिक स्वच्छतेच्या समस्या सोडवण्यावरच नाही, तर दीर्घकालीन बदलाची पायाभरणीही आम्ही करत आहोत. या प्रवासाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान असून रहिवाशांना प्रत्यक्ष परिणाम दिसेल, जाणवेल आणि अभिमान वाटेल अशा पद्धतीने कार्य करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असे सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक अमित साळुंखे यांनी सांगितले.
“सुमीत एल्कोसोबत भागीदारी करणे हे स्वच्छ आणि कचरामुक्त कल्याण-डोंबिवलीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले स्मार्ट पाऊल आहे. कार्यक्षम कौशल्य आणि उत्कृष्टतेबद्दलच्या वचनबद्धतेमुळे हा उपक्रम नागरी स्वच्छतेत नवीन मापदंड निर्माण करेल आणि आपल्याला कचरामुक्त कल्याण-डोंबिवलीच्या स्वप्नाच्या अधिक जवळ नेईल,” असे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.