संग्रहित फोटो
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसापासून गोकुळच्या थंड असलेल्या दुधाला उकळी फुटली असून, आता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टाई केली जाणार आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा अरुण कुमार डोंगळे हे गुरुवारी देणार आहेत. या पदासाठी शशिकांत पाटील व अजित नरके या दोघांची नावे आता चर्चेत आली आहेत त्यामुळे गोकुळचे उकळलेले दूध आता थंड होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे असणारे वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली एक मुखी सत्ता मिळवली तर विरोधी महाडिक गटाच्या शौमिका महाडिक या महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. आघाडीच्या ठरलेल्या धोरणानुसार पहिले अडीच वर्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना अध्यक्ष करण्यात आले तर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. पुन्हा अध्यक्ष पदासाठी संचालक अरुणकुमार डोंगळेना संधी देऊन या पदावर विराजमान करण्यात आले १४ मे रोजी त्यांचा कार्यकाल संपत असताना त्यांनी या पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र अरुण डोंगळे यांनी या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून दूध संघातील राजकारण चांगलेच तापले होते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अरूण डोंगळे यांना राजीनामा देऊ नका, पुढील अध्यक्ष महायुतीचा असेल असा आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दोघांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला असेल तर काहीतरी नक्की घडणार हे निश्चित होते. गोकुळमध्ये सत्ता गेल्यानंतर पुन्हा महाडिकांच्या हातात सत्ता यावी यासाठी जोरदार धडपड सुरू होती.
गेल्या चार दिवसापासून पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या यामध्ये अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते अखेर या प्रयत्नाला निश्चित असले तरी अध्यक्ष पदाचा राजीनामा आणि नूतन अध्यक्षाची निवड याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आदी भेट घेणार आहेत.