नगरपरिषद शिक्षकांना एनपीएसचा दिलासा, अर्जुन कोळी यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यशस्वी प्रतिसाद
कराड : राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर हा निर्णय झाला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वाखाली या मागणीसाठी राज्यभर सातत्याने निवेदने, बैठका आणि शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न शासनाच्या अजेंड्यावर आला आणि अखेर सकारात्मक निर्णय झाला.
या प्रश्नासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या मागणीची प्रभावी मांडणी केली. त्यांच्या प्रयत्नांनाही या निर्णयात महत्त्वाचे स्थान असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, हा विजय संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा, शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा आणि शासनाच्या सकारात्मक भूमिकेचा आहे,अशी प्रतिक्रिया दिली. एनपीएस लागू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रक्रियेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दोन वेळा चर्चेसाठी निमंत्रित केले होते. तसेच कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनीही या मागणीसाठी पुढाकार घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. अतुल भोसले आणि नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी आभार मानले.






