अजित पवार गटाला जोरदार झटका! 'या' बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्यांना सन्मान देणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करत, ठाणे महापालिकेतील विरोधीपक्ष नेते प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम केला असून, शेकडो समर्थकांसह ते परत आपल्या मूळ घरी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांचे मनापासून स्वागत केले. या प्रसंगी ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर प्रकाश बर्डे हे त्यांच्यासोबत गेले होते. मात्र, पक्षाच्या मूळ विचारधारेपासून आणि कार्यकर्त्यांच्या पाठींब्यापासून दूर झाल्याची जाणीव झाल्यानंतर, त्यांनी आज आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह पुनरागमनाचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे, बाळू चौगुले, सचिन हणुमंते, रमेश संकपाळ, अनिकेत शेलार, सनी कसबे, राकेश सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
Maruti Invicto क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास? BNCAP मध्ये किती मिळाले रेटिंग?
या प्रसंगी बोलताना डाॅ. आव्हाड म्हणाले, “नगरसेवक प्रकाश बर्डे आणि पंकज पांड्ये यांनी माझ्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. काही काळ ते आमच्यापासून दूर गेले होते, मात्र आज त्यांनी परत येण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. हे कार्यकर्ते हाडाचे आहेत आणि अशा कार्यकर्त्यांच्या पुनरागमनामुळे पक्षाला नवे बळ मिळते. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो.”
आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश बर्डे म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा-मुंब्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला. कधीकाळी दुर्लक्षित असलेल्या या भागाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. विकासकामांची दिशा दाखवून सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. त्यांच्या नेतृत्वात सर्वसमावेशकता आहे आणि कार्यकर्त्यांना मान आहे. या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास असून, यापुढे आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू.”
या प्रवेशामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला नवे बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने झालेल्या या पुनरागमनाने पक्ष संघटनात्मक दृष्ट्या आणखी मजबूत होणार असून, आगामी निवडणुकांमध्ये या निर्णयाचा थेट परिणाम दिसून येईल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.