सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंचर : कांदाचाळीत साठवलेला कांदा शेतकरी पिशवीमध्ये भरून बाजारात पाठवत आहेत. परंतु बाजार भाव नसल्याने आणि कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याने भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आहे. कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे समोर येत असून, सध्या पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. खराब झालेल्या बदला कांद्याला चार ते पाच रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे.
मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणामुळे, घोडनदीला बारमाही पाणी राहते. त्याचप्रमाणे डिंभा उजवा व डावा कालवा यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मे महिन्यापासून कांदा सहा महिने झाले तरी पुरेसा बाजारभाव नसल्याने बराखीत पडून आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव पडले असून १३ ते १४ रुपये प्रति किलो असा बाजारभाव चांगल्या कांद्याला मिळत आहे. परंतु खराब झालेल्या बदला कांद्याला चार ते पाच रुपये बाजारभाव मिळत आहे. कांदा पिक चार महिन्याचे दिसत असले तरी वस्तूस्थिती कांदा पिक हे १२ ते १३ महिने शेतकऱ्यांना सांभाळावा लागतो. त्यामुळे एकंदरीतच कांदा पीक हे पूर्ण एक वर्षभराचे होते.
शेतकरी वर्ग मेटाकुटीला
बियाणे टाकल्यापासून एकंदरीतच कांद्याचा होणारा भांडवल खर्च व मिळणारे उत्पन्न यात मोठे तफावत असून, शेतकरी वर्ग कांदा पिक पुढच्या वर्षी करायचे नाही या मनस्थिती येऊन ठेपला आहे. एकंदरीतच सध्या तरी कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे समोर येत असून सध्या पडलेला बाजारभावाने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.






