अहमदनगर : ईदगाह मैदानाच्या संरक्षण भिंतीलगत विद्युत खांबावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही या प्रकाराला आळा बसला नाही. दुसऱ्या दिवशी याच भागात आणखी दोन ठिकाणी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकले.
ईदगाह मैदानावरील झेंडा पोलिसांनी काढून ताब्यात घेतला. त्यानंतर 24 तास उलटत नाही तोपर्यत कोठला परिसरातील राज चेंबर्स बिल्डींगवर लायबा इंटरनॅशनल बोर्डाच्या शेजारी एका लोखंडी अँगलला व हॉटेल गुलशन नावाच्या बोर्डवर पॅलेस्टाईनचे झेंडे लावण्यात आले. तोफखाना पोलिसांनी सकाळी साडेसात वाजता दोन्ही ठिकाणचे झेंडे काढून घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.
रमजान ईदमुळे कोठलातील ईदगाह मैदानाची साफसफाई बुधवारी करण्यात आली होती. याच मैदानालगत असलेल्या एका विद्युत खांबाचा आधार घेत पॅलेस्टाईनचा झेंडा लावला होता. हा झेंडा कोणी, कधी आणि केव्हा लावला याची माहिती नाही. कोतवाली पोलिसांना हा झेंडा तात्काळ खाली उतरवून गुन्हा दाखल केला. रमजान ईदमुळे कोठला परिसरात तोफखाना पोलिसांचा बंदोबस्त सकाळी सहा वाजेपासून तैनात होता. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, रावसाहेब खेडकर, योगेश खामकर, शेख व सौरभ त्रिमुखे यांचे पथक कोठला परिसरात गस्त घालत असताना त्यांना राज चेंबर्स बिल्डींगवर एका लोखंडी अँगलला व हॉटेल गुलशन नावाच्या बोर्डवर पॅलेस्टाईन झेंडे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ दोन्ही ठिकाणचे झेंडे काढून घेतले. हे झेंडे कोणी लावले, याचा शोध पोलीस घेत आहेत. अंमलदार शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे.