Pandharpur Mangalvedha Split In The Congress Support Anil Sawant
पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढ्यात राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे.
पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँगेस कडून भगीरथ भालके रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. काँग्रेसआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन, आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
आज (दि.09) त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला आहे. काँगेस पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, व्ही, जे, एन, टी शहराध्यक्ष गोकुळ माने, सोशल मीडिया अध्यक्ष महेश अधरराव, त्याचे जिल्हा सचिव पांडुरंग डांगे, काँग्रेसचे विधानसभा युवक अध्यक्ष सोमनाथ आरे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सागर कदम, शैलेश घोगरदरे, अंशुभन शिंदे, काँग्रेस सरचिटणीस पिंटू जाधव, शहर सचिव अनिल माने, शहर सचिव सुदीप पवार, शहर उपाध्यक्ष आण्णा अधरराव, किशोर महाराज जाधव आदी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला.
शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना म्हणाले, यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक केवळ पाणी प्रश्न आणि रस्त्याच्या समस्येवर लढवली गेली. यावेळी पहिल्यांदाच अनिल सावंत यांनी मतदार संघात यापुढे जाऊन शिक्षण संस्था, रोजगाराचे मुख्य केंद्र उभारण्याचा विचार मांडला आहे. आम्हाला अनिल सावंत यांचे विचार पटले, विकासासंबंधीची त्यांची धडपड आम्हाला भावली. आणि म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
“याबरोबरच काँग्रेसने दिलेला उमेदवारही आम्हाला पसंत नाही. काँग्रेसचा उमेदवार आम्हाला विचारत नाही, विश्वासात घेत नाही. प्रणिती शिंदे आमच्या नेत्या आहेत. मात्र आमचा निर्णय झालेला आहे. आता माघार घेण्याचा कोणताही प्रश्न नाही”.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी आणि पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले. माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, “पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ आहे. काल जयंत पाटील यांनी देखील अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे, हा प्रश्न नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढून ही जागा निश्चितपणे जिंकणार आहोत,” असे मत अनिल सावंत यांनी व्यक्त केले.
Web Title: Pandharpur mangalvedha split in the congress support anil sawant