Pandharpur Roads In Bad Condition Potholes Repair Before Ashadhi Wari 2025
आषाढी वारीची तयारी तर जोरदार; मात्र पंढरपूर शहरातील रस्त्यांची झालीये अक्षरशः चाळण
पंढरपूरमध्ये दररोज हजारो भाविक येत असतात. तसेच आषाढी वारी लवकरच सुरु होणार आहे यामुळे लाखो वारकरी जमत असतात. मात्र पंढरपूरमधील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे दिसून येत आहे.
आषाढी वारीपूर्वी पंढरपूर मधील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
पंढरपूर – नवनाथ खिलारे : लवकरच आषाढी वारी सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीसह पालखीमार्गाची डागडुजी केली जात आहे. मात्र वैष्णवांचा मेळा जमत असलेल्या पंढरपूर शहरातील रस्त्यांची मात्र अत्यंत बिकट अशी अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होताच या रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. खोदकामानंतर वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे आणि ऐन पावसात डांबरीकरणाचे घेतलेले काम पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे.
राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक रस्ते हे खराब झाले असून त्याचे डांबरीकरण निघाले आहे. पंढरपूरमधील रस्त्यांची वाईट अवस्था दिसून येत आहे. सावरकर चौक ते सरगंम चौक दरम्यान काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेले हॉटमिक्सिंग पाहता पाहता पावसात वाहून गेले. यापूर्वी अशाचप्रकारे भर पावसात इंदिरा गांधी चौक ते अंबाबाई पटांगण चौक कार्तिक वारी दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. ते देखील पावसात वाहून गेले. बाजारपेठेतील रस्ते देखील दुरूस्त न केल्यामुळे ते खड्डेमय बनलेले आहेत. सरकारी कामांचे नियोजन आणि गुणवत्ता यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उपनगरातील विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जलवाहिनी, सांडपाणी आणि वीजवाहिनीच्या कामांमुळे सातत्याने रस्त्यांचे खोदकाम चालू आहे. संतनगर, संतपेठ, विस्थापित नगर, अनिलनगर, घोंगडेगल्ली, गोविंदपुरा आणि महात्मा फुले नगर वसंत नगर प्रशांत परिचारक नगर या भागांतील रस्तेही खड्डयांनी पोखरले आहेत. तालुका पोलीस स्टेशन ते पुणे रोड दरम्यानचा सर्व्हिस रोड तर वाहनचालकांसाठी धोक्याचे ठिकाण ठरतो आहे. इतर भागांत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. कामे सुरू झाल्यावर त्यांची पूर्णता किंवा रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे गांभीर्य कुठेच दिसत नाही.
बसस्थानकात ‘खड्डेमय’ स्वागत
पंढरपूर बस स्थानकाचा परिसर म्हणजे खड्ड्यांचे जाळे आहे. आत-बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारांवर खड्डे, फुटलेल्या गटाराच्या लाद्या आणि चिखलाने भरलेला परिसर, हे सगळे प्रवाशांना दररोज झेलावे लागत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या महत्त्वाच्या केंद्राची ही दुरवस्था पाहता, जबाबदार यंत्रणांची उदासीनता स्पष्ट होते.
नागरिक आता केवळ रस्ते दुरुस्त होण्याची नाही, तर ते टिकाऊ असण्याची मागणी करू लागले आहेत. पावसाळ्यात वाहतुकीचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न बिकट झाला आहे. यंत्रणांनी वेळेत, दर्जेदार आणि नियोजनबद्ध कामे केली नाहीत, तर या खड्ड्यांमधून नाराजी आणि संतापाच्या लाटा लवकरच उसळतील, हे निश्चित.
काही भागात अपघातांचा धोका
लक्ष्मी टाकळी येथील नवीन रेल्वे पुलाचे सुरू असलेल्या कामामुळे लक्ष्मी टाकळी, कासेगांव, अनवली परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी मालवाहू वाहने रुतून बसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रस्त्यांचे काम ऐन पावसाळा सुरू झाल्यावर हाती घेण्यात आले. त्याचे परिणाम डांबर वाहून गेले आहे. पावसाआधी चार महिने आधी हॉटमिक्सिंग झाले पाहिजे, अशी तज्ज्ञांची शिफारस असूनही ती दुर्लक्षित केली जाते.
Web Title: Pandharpur roads in bad condition potholes repair before ashadhi wari 2025