पुणे श्रमिक पत्रकारसंघ
Paralympics Sachin Khilari : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करीत रौप्यपदकाला गवसणी घालणाऱ्या सचिन खिलारी आज पत्रकारसंघात वार्तालापदरम्यान त्याच्या यशाचा आलेख मांडला. सचिन खिलारीने त्याच्या सुरुवातीपासून ते थेट रौप्यपदकाला गवसणी घालणारा इतिहास आज पत्रकारसंघाच्या वार्तालापादरम्यान मांडला.
सर्व सराव पुण्यातच
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण झालेला सचिन खिलारी याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी सर्व सराव पुण्यातच केल्याची कबुली दिली. सांगलीच्या करागणी तालुका आटपाडी येथील रहिवासी असलेल्या सचिनने अगदी ग्रामीण भागापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सचिनने 11 वीला बारामती येथे प्रवेश घेतला. इयत्ता 12 वीला खेळाकडे लक्ष दिल्याने मार्क्स कमी पडल्याने वडिलांनी खेळापासून दूर जाण्यासा सांगितले. बीई मॅकेनिकल इंजिनिअर व्हायचे असा सज्जड दम भरत सिंहगड इन्स्टिट्यूटला त्याने प्रवेश घेतला. सचिनने इंजिनिअरचे लक्ष ठेवून मार्गक्रमण सुरू केले, अन् बीई मॅकनिकलचा डिप्लोमा पास झाला. परंतु खेळाची आस काही सुटत नव्हती अन् एकदा देवेंद्र झाझडिया या दिव्यांग खेळाडूंचा पेपरमध्ये पाहिलेला फोटो पाहून आपणही त्यांच्यासारखे बनायचे असा चंग बांधला. त्याच्या या निश्चयाला 3 इडियट्स सिनेमाने अधिक बळकटी दिली.
या मेडल्सचा नोकरीसाठी फायदा नाही
सचिनने अश्वमेध स्पर्धेत पुणे विद्यापीठासाठी सुवर्णदेखील आणले आहे. परंतु, त्याचा नोकरीत कोणताही उपयोग झाला नसल्याची कबुली सचिनने दिली. आशियाई चॅम्पियनमध्येदेखील सचिनने गोळाफेकमध्ये सुवर्ण आणले. त्यानंतर त्याचा प्रवास पॅरालिम्पिकसाठी झाला. त्यानंतर जे झाले ते सर्व जगाने पाहिले. पॅरालिम्पिक असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्षांसह आझम स्पोर्ट्स अकादमीनेदेखील मोलाचे सहकार्य केल्याची कबुली सचिनने दिली.
मानधन वाढवण्याची मागणी
दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र पॅरालिम्पिक असोसिएशन चांगले काम करीत आहे, याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आवाहनसुद्धा सचिनने केले. दिव्यांग बांधवांसाठी सरकार चांगले नियोजन करीत आहे. परंतु, कॅपेबल खेळाडूंना जेवढे मानधन मिळते तेवढे मानधनसुद्धा पॅरा खेळाडूंना मिळावे अशी अपेक्षादेखील त्याने व्यक्त केली.