सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी/ विजया गिरमे : उद्योगनगरी हे महाराष्ट्रातील एक वेगाने वाढणारे औद्योगिक आणि शहरी क्षेत्र आहे. त्यामधील सर्वाधिक वाहतूकीचा कणा मानला जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बससेवा आजही अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा नसलेल्या अवस्थेत सुरू आहेत. यात पिंपरी चिंचवडमधील बीआरटीएस मार्गावर कचऱ्याची समस्या, सीसीटीव्ही यंत्रणा नसने, रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः बस थांब्यांचा अभाव ही गंभीर समस्या बनली आहे. परिणामी, दुपारच्या कडक उन्हात प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. ज्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जुनाट अन् मोडकळीस आलेले थांबे
हिंजवडी, थेरगाव, चिखली, चिंचवड मधील चाफेकर चौकात अशा अनेक भागांमध्ये बस थांबे नाहीत. काही ठिकाणी जुनाट थांबे असून, ते मोडकळीस आलेले आहेत किंवा त्यांच्यावर छप्परही नाहीत. तसेच शहरातील बसथांब्यावर किंवा बसस्थानकावर एकाही मोठ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यासह निगडीतील पवळे उड्डाण पूल समोरच्या बस थांब्यावरून पुण्याला आणि लोणावळ्याला अनेक प्रवासी ये-जा बसने करत असतात. परंतु या बस थांब्यावर प्रवाशांना उभे राहण्यासाठी सावली तसेच बसण्यासाठी जागा नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दुपारच्या कडक उन्हामुळे आरोग्यावर परिणाम
उन्हाळ्यात तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर जाते. छप्पर नसल्यामुळे उन्हात उभे राहिल्याने डिहायड्रेशन, चक्कर येणे, किंवा उष्माघात होण्याचा धोका वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर परिणाम: कडक उन्हामुळे या वयोगटातील लोकांना उन्हाचा जास्त त्रास होतो.
संभाव्य उपाययोजनांची गरज
निगडीतील मधुकर पवळे उड्डाण पुलागत असलेल्या बस थांब्यावर सावली आहे ना बसण्यासाठी पुरेशी जागा. जास्त गर्दी असल्याने उभेच राहावे लागते. आमच्या सारख्या ज्येष्ठांनी कसा प्रवास करावा?
-अशोक मोरे, जेष्ठ प्रवासी.
हिंजवडी बस थांब्यावर सकाळ संध्याकाळ नेहमीच गर्दी असते. कित्येकदा अनेक लोकांचे मोबाईल फोन, पर्स चोरीला गेले आहेत. अनेक दिवसांपासून या बस थांब्यावर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड नाही किंवा बसची वाट पाहत बसण्यासाठीचे कोणते ठिकाणआहे.
-ऋतुजा सावंत, प्रवासी
नव्याने बस थांबे उभारण्यासाठी निविदाही जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी बस शेड लावण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील सर्वच ठिकाणी जुन्या बस थांब शेड थांब्याची पाहणी करून बदलण्यात येणार आहेत.
-दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक व्यावसायिक