औरंगाबाद – नामांतराविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांचा नामांतराला विरोध असेल, तर त्यांनी मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करावे, अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शहराचे नामांतर करण्याचे अधिकार कोणालाही नाही. शहराचे नाव बदलण्यासाठी नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मतदान घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली, ते 11 जुलैला आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
इम्तियाज जलील म्हणाले, शहाराच्या नामांतराविरोधात नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवार 12 जुलै रोजी दुपारी दोन वाजता भडकल गेट येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तो मोर्चा आमखास मैदानापर्यंत जाणार आहे. त्यानंतर शिष्ठमंडळ विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहे.