PCMC, MahaMetro, Abhishek Barne, Pimpri Nigdi Metro, Road Repair,
PCMC Maha Metro: पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था महामेट्रोला महागात पडण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत मेट्रोच्या कामामुळे खराब झालेले रस्ते पूर्ववत केले जात नाहीत, तोपर्यंत निगडी येथील चौथ्या स्थानकासाठीचा महापालिकेचा हिस्सा आणि अतिरिक्त निधी मिळून ५० कोटी रुपये दिले जाणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी घेतली आहे. यामुळे या विस्तारित मार्गाच्या निधी वितरणावर सध्या टांगती तलवार आहे.
राज्यात 60 ट्रॅफिक गार्डन्स उभारणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. ६) अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडी या ४.४१ किलोमीटरच्या मार्गासाठी सुरुवातीला ९१० कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. मात्र, राज्य शासनाने निगडी येथील टिळक चौकात चौथे अतिरिक्त स्थानक उभारण्याचा निर्णय घेतल्याने प्रकल्पाचा खर्च ९६० कोटी १८ लाख रुपयांवर पोहोचला आहे. यातील अतिरिक्त ५० कोटींच्या खर्चात राज्य शासन आणि महापालिका प्रत्येकी २५ कोटींचा वाटा उचलणार आहे. या विषयाला मंजुरी मिळणे अपेक्षित होते, मात्र रस्ते दुरुस्तीच्या मुद्द्यावरून अध्यक्ष बारणे यांनी सलग चौथ्या सभेत हा प्रस्ताव तहकूब केला.
सध्या या मार्गाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून व्हायडक्टचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, हे काम करताना निगडी ते चिंचवड दरम्यानचे सेवा रस्ते आणि मुख्य रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले गेले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, राडारोडा आणि उडणारी धूळ यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विकासकामे महत्त्वाची असली तरी सर्वसामान्यांचे हाल खपवून घेतले जाणार नाहीत. महामेट्रोने आधी आपले दायित्व ओळखून खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. त्यानंतरच महापालिका आपला हिस्सा वर्ग करेल.
अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, स्थायी समितीने आता दुरुस्तीची अट घातल्यामुळे महामेट्रोला हा निधी मिळवण्यासाठी आधी शहरातील रस्ते चकचकीत करावे लागणार आहेत. मेट्रो प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






