'वार्नर ब्रदर्स'तर्फे 'समर फिएस्टा २०२६'ची घोषणा
मुंबई: वार्नर ब्रदर्स डिस्कवरी कंपनीने भारतीय बालप्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी आणली आहे. २०२६ च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अधिक मनोरंजक बनवण्यासाठी कंपनीने ‘समर फिएस्टा’ या त्यांच्या आजवरच्या सर्वात मोठ्या स्थानिक आशय उपक्रमाची घोषणा केली आहे. या अंतर्गत पोगो आणि कार्टून नेटवर्क या दोन आघाडीच्या वाहिन्यांवर भारतातच तयार झालेले दोन नवीन ओरिजिनल शोज् प्रदर्शित केले जाणार आहेत. पोगो, कार्टून नेटवर्क आणि डिस्कव्हरी किड्स या तीन वाहिन्यांवर मिळून २०० हून अधिक नवीन एपिसोड्स मुलांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.
या नवीन उपक्रमाची घोषणा करताना दक्षिण आशिया, वार्नर ब्रदर्स डिस्कवरीचे फॅक्चुअल एंटरटेनमेंट, लाइफस्टाइल अँड किड्स हेड श्री. अभिषेक म्हणाले, “आम्ही फक्त शोज् तयार करत नाही, तर मुलांसाठी एक नवीन जग निर्माण करतो. पोगोवर ‘संपत चंपत’ आणि कार्टून नेटवर्कवर ‘कियान अँड किकी’ या नवीन शोज्च्या माध्यमातून आम्ही ओरिजिनल भारतीय आयपीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. या उन्हाळ्यातील कार्यक्रम मुलांसाठी वर्षभराचा ट्रेलर असतील.”
या उन्हाळ्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘संपत चंपत’ हा शो पोगोवर सुरू होत आहे. ‘लोटपोट कॉमिक्स’च्या प्रसिद्ध पानातून लहान मुलांची आवडती कॉमिक जोडी आता अॅनिमेटेड स्वरूपात पडद्यावर येणार आहे. दोन गमतीदार चोरांच्या खोड्या आणि छोट्या गावांमधील आपुलकीची भावना या शोमधून रंगीबेरंगी अॅनिमेटेड जगात जिवंत करण्यात आली आहे.
कार्टून नेटवर्क वाहिनीवर ‘कियान अँड किकी’ (Kian & Kiki) हा २०२६ मधील सर्वात मोठा शो लॉन्च होत आहे. कोस्मोस माया आणि फेबल स्पिनर्स स्टुडिओच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही मालिका जादूगारांच्या एका कुटुंबावर आधारित आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा, जादू आणि कॉमेडीचे उत्तम मिश्रण यात पाहायला मिळेल. हे नवीन ओरिजिनल शोज् ‘डिस्कव्हरी+’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्ट्रीम केले जातील.
या सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदाच पोगो वाहिनीवरील मुलांचे दोन सर्वात लाडके हिरो— ‘छोटा भीम’ आणि ‘लिटिल सिंघम’ एकाच अॅनिमे-प्रेरित जगात एकत्र येऊन नवीन मोहिमा फत्ते करताना दिसणार आहेत. याशिवाय ‘ओमी नंबर १’ आणि ‘जय जगन्नाथ’ हे शोज् देखील सुरू राहतील. यंदा ‘छोटा भीम’चा १८ वा वाढदिवस साजरा केला जात असून, त्यानिमित्त विशेष टेलिफिल्म्स आणि ‘ओरिजिन ऑफ भीम बिग पिक्चर’चे खास शो दाखवले जातील.
कार्टून नेटवर्कवर ‘सीएन बूम बॅम कॉमेडी जॅम’ अंतर्गत ‘टीन टायटन्स गो!’ आणि ‘बॅटव्हील्स’चे नवीन सीझन येणार आहेत. तसेच ‘बेबी लेमिंग्स’, ‘द विझी फॅमिली’ आणि ‘मॅका अँड रॉनी’ या आंतरराष्ट्रीय हिट मालिका मराठी व भारतीय भाषांमध्ये दर तीन महिन्यांनी नव्या रूपात सादर केल्या जातील. दुसरीकडे, डिस्कव्हरी किड्स वाहिनीवर ‘टिट्टो’ आणि ‘मिस्टर बीन’च्या नव्या भागांसह नॉनस्टॉप बदमाशी आणि धमाल सुरू राहणार आहे.
मुलांचे हे मनोरंजन फक्त टीव्ही स्क्रीनपुरते मर्यादित राहणार नाही. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, सूरत, हैदराबाद आणि विशाखापट्टणमसह देशातील १४ मोठ्या शहरांमधील २० हून अधिक मॉल्स आणि ‘बाउन्स’ या भारतातील सर्वात मोठ्या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये ऑन-ग्राउंड अॅक्टिव्हिटीज आयोजित केल्या जाणार आहेत. तिथे मुलांना छोटा भीम, लिटिल सिंघम, टॉम अँड जेरी या त्यांच्या आवडत्या पात्रांच्या लाईव्ह मॅस्कॉट्सना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, छोटा भीमच्या डिजिटल वाढदिवसानिमित्त चाहत्यांना डिजिटल लाडू केकद्वारे भीमचा एक भव्य डिजिटल पुतळा बनवण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे विशेष आमंत्रणही दिले जाणार आहे.






