पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार (Photo Credit- X)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या पीसीबी समूहाची पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा २१ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान झाली. राज्यात पहिल्या संधीच्या सीईटीसाठी २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६३ हजार २०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या पीसीबी सीईटी परीक्षेला ९२.६५ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर १३ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून विद्यार्थ्याला या सीईटी प्रवेश परीक्षेत दिलेल्या प्रश्नावर आणि उत्तरावर आक्षेप नोंदवता येईल.
मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप
जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप असेल तर वरील परीक्षेसाठी आक्षेप ट्रॅकिंग पर्यायाद्वारे आक्षेप नोंदवू शकतो, वरील तारखेमध्येच विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनद्वारे आक्षेप सादर करता येईल. विद्यार्थ्याला प्रती प्रश्न/प्रती आक्षेपासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन लॉगिनद्वारे भरावी लागणार आहे.
ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन/तक्रारी विचारात घेतले जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेमध्येच सीईटी प्रवेश परीक्षेतील प्रश्नावर आणि उत्तरावर काही आक्षेप असतील तर ते या ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे नोंदवावेत असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे.






