या हृदयद्रावक दुर्घटनेत शंकर आबा लोखंडे (वय ८०, रा. पांडोझरी, ता. जत), मंगल भाऊसाहेब मोटे (वय ४५, रा. पांडोझरी, ता. जत), संगीता राम चौधरी (वय ४२, रा. टक्कळकी, ता. तिकोट), अरुण विष्णू गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजापूर), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजापूर) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे, यात्रेचा आनंद अनुभवण्यासाठी आलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या दुर्घटनेने अनेकांना अश्रू अनावर झाले.
जतमध्ये दिवसाढवळ्या ‘बिबट्या सदृश्य’ प्राण्याचे दर्शन; साखर कारखाना परिसरात भीतीचे सावट
मिळालेल्या माहितीनुसार, मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविक मोटेवाडी येथे जमले होते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात मोठा निवारा शेड उभारण्यात आला होता. मात्र, अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने हा शेड काही क्षणांत कोसळला. त्याखाली उभे असलेले अनेक भाविक दबले गेले आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
आरडाओरड, मदतीसाठी होणाऱ्या हाका आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ मदतकार्य सुरू केले. लोखंडी पाइप, पत्रे आणि शेडखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.
या दुर्घटनेत राजू राम चौधरी (वय २६) आणि बिराप्पा भाऊसाहेब मोटे (वय २२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. यात्रेसाठी जमलेल्या भाविकांवर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावोगावी हळहळ व्यक्त होत आहे.






