कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
Yavatmal News: कपाशी पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे तसेच पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर ऑगस्ट महिन्यापासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरुपात दिसून येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. असे करा रसशोषण किडीचे व्यवस्थापनः बीटी कपाशीच्या बियाण्यास इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथोक्साम या कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे रसशोषक किडींपासून सर्वसाधारणपणे २ ते ३ आठवड्यांपर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या कालावधीत अनावश्यक कीटकनाशकांची फवारणी करू नये. वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा किडींसहित गोळा करून नष्ट करावा. पिकाच्या उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टर २५ या प्रमाणात लावावेत व त्याद्वारे विशेषतः पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावावर नियमित लक्ष ठेवावे.(फोटो सौजन्य – AI)
दिवसांनी फेरोमोन/कामगंध सापळ्यांचा वापर करावा. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सापळे पिकाच्या वरच्या भागापासून योग्य अंतरावर राहतील, याची काळजी घ्यावी. प्रति एकर २ किंवा प्रति हेक्टरी ५ फेरोमोन सापळे लावावेत सलग तीन दिवस सापळ्यामध्ये ८ ते १० पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुरू कराव्यात. सामूहिक नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत. प्रत्येक गावात तसेच कापूस संकलन केंद्रे व जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याला पतंगांचे निरीक्षण व नियंत्रण करावे. कपाशी पिकातील डोमकळ्या नियमितपणे शोधून अळीसहित नष्ट करावे, त्यामुळे पुढील पिढ्यांची वाढ रोखण्यास मदत होते.
पिकाच्या उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर १५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच पर्याय म्हणून अॅझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पिकाच्या उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी त्यानंतर १२ ते १७ दिवसांच्या अंतराने गुलाबी बोंडअळीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाटॉइडिया बॅक्ट्री किंवा टॉयकोग्रामा चिलोनिस या परोपजिवी मित्रकिटकांची १.५ लाख अंडी प्रति हेक्टरी चार वेळा सोडावीत.
कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन करताना केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता पिकाचे नियमित निरीक्षण, पिवळे चिकट सापळे व कामगंध फेरोमोन व सापळ्यांचा वापर, प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या नष्ट करणे, निंबोळी अर्काचा वापर, जैविक नियंत्रण, मित्रकिटकाचे संवर्धन आणि आर्थिक नुकसानीच्या पातळीवरच आवश्यक रासायनिक या एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब करावा. कीटकनाशकांची फवारणी करताना लेबलवरील सूचना, शिफारशीत मात्रा, प्रतीक्षा कालावधी व आवश्यक सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करावे अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी टाळावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी कळविले आहे.
जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा, जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही व पीक दाट होणार नाही. रसशोषक किडींवर उपजीविका करणारे नैसर्गिक मित्रकीटक, जसे सिरफिड, माशी, कातीन, ढालकीडे, क्रायसोपा तसेच अनॅसिस प्रजातीचे परोपजीवी किटक पुरेशा प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. रसशोषक किडींच्या प्रादुर्भावासाठी १० मावा प्रति पान किंवा २ ते ३ तुडतुडे प्रति पान किंवा १० फुलकिडे प्रति पान किंवा मावा, तुडतुडे व फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या १० प्रति पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी प्रति १० लिटर पाण्यात बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २५ मिली, फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मिली, इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.






