प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सांघिक कौशल्याच्या जोरावर तमिळ थलाईवाजचा गुजरात संघावर विजय
पुणे : सांघिक कौशल्याच्या जोरावर तमिळ थलाईवाजने गुजरात जायंटस संघावर ४०-२७ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीगमध्ये आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला तमिळ संघाकडे १९-८ अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.
मिळ थलाईवाज संघाच्या जोरदार चढाया
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी हा सांघिक खेळ आहे, याचाच प्रत्यय घडवीत तमिळ थलाईवाज संघाने सुरुवातीपासूनच चढाया व पकडी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली सामन्याच्या पंधराव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढवीत १४-६ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मध्यंतराला त्यांच्याकडे १९-८ अशी आघाडी होती.
तमिळ संघाने आणखी एक लोण चढवला
उत्तरार्धात दुसऱ्याच मिनिटाला तमिळ संघाने आणखी एक लोण चढवला व आपली बाजू बळकट केली. सामन्याच्या पंचविसाव्या मिनिटाला त्यांच्याकडे २७-८ अशी आघाडी होती. हा सामना एकतर्फी होणार असे वाटत असतानाच सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला गुजरातने तमिळ संघावर लोण चढवीत सामन्यातील उत्सुकता वाढवली.
अर्थात त्यावेळी देखील तमिळ संघाकडे दोन आकडी गुणांची आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना तमिळ संघ ३४-१९ असा आघाडीवर होता. तमिळ संघाकडून मोईन शफागी, हिमांशु कुमार, सौरभ फगरे यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळ केला. गुजरात संघाकडून हिमांशु सिंग व राकेश कुमार यांनी चांगली लढत दिली.