संग्रहित फोटो
पंढरपूर : डोळ्यात चटणी टाकून एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन चोरांना पकडून त्यांच्याकडून १२ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद गोविंद पिंगळे व महादेव शंकर पवार (रा. उजनी कॉलनी श्रीपूर ता. माळशिरस) या आरोपींना अटक केली आहे. या दरम्यान आणखी चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंढरपूर शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २७ आगस्ट रोजी इसबावी येथील फिर्यादी मैत्रेयी मंदार केसकर यांच्या अंगावर मिरची पुड टाकून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले होते. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके तैनात करून नाका बंदी केली होती.
यादरम्यान मोटार सायकलवरून संशयित दोघे जात असताना पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकल थांबवली नाही. पोलिसांनी पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता आरोपींना चोरी केल्याचे उघड झाले आहे. चोरांकडून सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल असा १२ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.