संग्रहित फोटो
पुणे : शारदीय नवरात्र उत्सव पुण्यनगरीत मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, यानिमित्ताने पुणे शहरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून (दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या उत्सवानिमित्ताने चतुःश्रृंगी देवी, भवानी माता, तांबडी जोगेश्वरी तसेच सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर भागातील वाहतूकीत बदल केला आहे. या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केला आहे.
आप्पा बळवंत चौक
नवरात्र काळात आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता बंद असणार आहे. बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहील. वाहनचालकांनी गाडीतळ पुतळा मार्गे शिवाजी रस्त्याचा पर्यायी मार्ग वापरावा.
भवानी माता मंदिर परिसर
रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅण्ड या दरम्यानचा महात्मा फुले रस्ता सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असून, नो-पार्किंग असणार आहे. पीएमपीएमएल बसेसना सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान चौक, खाणेमारुती चौक मार्गे वळविण्यात आले आहे. वाहनचालकांसाठी संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पदमजी चौकी चौक व भगवान बाहुबली चौक या मार्गांवरून पर्यायी वाहतूक व्यवस्था केली आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसर
लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराकडून तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्यांनाही प्रवेशबंदी केली आहे. वाहनांना सेवासदन चौक – बाजीराव रस्ता – शनिवारवाडा मार्गे जावे लागेल.
चतुःश्रृंगी मंदिर परिसर
सेनापती बापट रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतुकीला एकेरी करून वेताळबाबा चौक, दीप बंगला चौक व ओम सुपरमार्केट मार्गे वाहने वळवली जातील. कॉसमॉस जंक्शन, वीर चाफेकर चौक व गणेशखिंड रोडवरून येणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने पॉलिटेक्निक मैदानाच्या पार्किंगमध्ये ठेवावीत, असे पोलिसांनी सांगितले.
महालक्ष्मी मंदिर येथे २३ सप्टेंबरला श्रीसुक्त
महालक्ष्मी मंदिर परिसरात २३ सप्टेंबरला सकाळी ५ ते ७ या वेळेत श्रीसुक्त व अथर्वशीर्ष पठण होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान जेधे चौक, सावरकर चौक व पुरम चौक परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीस बंदी असेल. वाहनांना मित्रमंडळ चौक व सिंहगड रस्ता मार्गे जावे लागेल येईल.
वाहतूक पोलिसांचे आवाहन
नवरात्र उत्सवाच्या काळात बंद मार्गांचा वापर टाळावा, दिलेले पर्यायी मार्ग व पार्किंग झोनचा वापर करावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.