पुणे : पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात १३ मे राेजी मतदान हाेणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हात उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा प्रचारात घाम निघणार आहे. पुण्याच्या हवेबरोबरच राजकीय वातावरणही तापलेले पुढील काळात दिसणार आहे.
निवडणूक आयाेगाकडून शनिवारी (दि. १६) लाेकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार पुणे , मावळ आणि शिरुर लाेकसभा मतदारसंघात १३ मे राेजी मतदान हाेणार आहे. तर बारामती लाेकसभा मतदारसंघात ७ मे राेजी मतदान हाेत आहे. यामुळे पुढील ५० ते ६० दिवस पुणे जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. पण ही रणधुमाळी रणरणत्या उन्हात पार पडणार आहे. मार्च महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरु झाला असून, उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
सध्या पुणे शहराचे कमाल तापमान हे ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील आठवड्यात दाेन अंश सेल्सिअसने पारा वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान ३४ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान नाेंदविले जाते. काही दिवस पुण्यातील तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचीही नाेंद आहे.
एकूणच लाेकसभा निवडणुकीत उमेदवार आणि कार्यकर्ते यांचा घाम निघणार हे निश्चित आहे. एप्रिल महिन्यात सामान्यपणे पुण्याचे हवामान काेरडे असते, मात्र यावर्षी मार्च महिन्यातील पंधरा दिवस, एप्रिल महिन्याचे तीस दिवस आणि मे महिन्यातील १३ दिवस हवामान उष्ण असताना राजकीय वातावरणही तापलेले असणार हे नक्की.
मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी लागणार कसोटी
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात शहरी भागाचा समावेश हाेताे. बारामती, शिरुर आणि मावळ मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण अशा दाेन्ही भागांचा समावेश आहे. या तीनही मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदारांंपर्यंत संपर्क साधण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते यांची कसाेटी लागू शकते. परीचर पत्रक, प्रचारपत्रके तसेच जाहीरनामा वाटप करणे, प्रचारसभा, काेपरा सभा आदींसाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ निवडून त्या दृष्टीने नियाेजन करावे लागणार आहे.
…तर प्रचाराला वेळ कमी
बारामती, शिरुर लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने अनुक्रमे सुप्रिया सुळे, डाॅ. अमाेल काेल्हे या विद्यमान खासदारांची उमेदवारी लवकरच जाहीर होऊ शकते. या दाेघांचा प्रचारही सुरु झाला आहे. अद्याप महायुतीकडून पुणे वगळता, बारामती, मावळ, शिरुर या तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेसला ( अजित पवार गट ) यापैकी बारामतीची जागा मिळू शकते, तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मावळ आणि शिरुरच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. महायुतीच्या जागा वाटपानंतर , उमेदवारी जाहीर करणे यात वेळ गेला तर प्रत्यक्ष प्रचाराला उशिर हाेऊ शकताे. तसेच पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काॅंग्रेसकडून उमेदवारी काेेणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट हाेत नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यास उशिर झाला तर त्या उमेदवाराची प्रचारात दमछाक हाेऊ शकते.