
Mira Bhayander
काशिमीरा चौकात गेल्या तीन दशकांपासून उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरा-भाईंदर शहराची ओळख मानला जातो. मात्र, पुतळ्याला तडे गेल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाकडून दुरुस्तीचा प्रस्ताव पुढे आला. याच पार्श्वभूमीवर पुतळा स्थलांतरित केला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून शिवप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे.या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार नरेंद्र मेहता म्हणाले, “पुतळ्याला तडा गेला आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि सर्वांच्या मताने ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. काही जण विनाकारण राजकारण करत आहेत. सरनाईक यांना महाराजांचा पुतळा पडला तरी चालेल का? दुरुस्ती करायची नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करत, “या विषयावर सरनाईक राजकारण करत आहेत. आम्ही महाराजांचा सन्मान करणारे लोक आहोत. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुतळा त्याच जागेवर पुन्हा उभारण्यात येईल,” असे सांगितले.तसेच, “वेस्टर्न हॉटेलजवळ जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हीच उभारला आहे. त्यामुळे शिवरायांबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे,” असेही मेहता यांनी नमूद केले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ सल्लागार आणि मूर्तिकार नेमण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, दुरुस्तीच्या काळात पुतळा हटवल्यानंतर तो पुन्हा मूळ जागी बसविण्यात येणार की अन्यत्र स्थलांतरित केला जाणार, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. यामुळे शिवप्रेमींमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काशिमीरा चौकातील शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.