अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून बिंदुनामावलीची प्रक्रिया रखडल्याने प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात धडक देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. परंतु अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेने दिली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावलीची प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने बिंदुनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाला सादर केला होता, मात्र कक्षाने प्रस्तावात त्रुटी काढल्या होत्या. शिक्षण विभागाने सदर त्रुटींची पूर्तताही केली. त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र, मान्यतेनंतरही गत १४ वर्षांपासून पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे, जिल्हा परिषद प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्ष महेश ठाकरे, प्रदीप वडतकर, अमोल वर्हेकर, अकोला जिल्हाध्यक्ष मंगेश टिकार यांची उपस्थिती होती.
पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत चर्चा
अकोला पं. स.अंतर्गत अद्याप चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू न करण्यात आल्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यावर गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांना फोन करून येत्या महिन्यात कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या तसेच बीएससी शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस हेमंतकुमार बोरोकार, जिल्हा कार्याध्यक्ष अमर भागवत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमित फेंडर, जिल्हा संघटक विजय शेगोकार, उपाध्यक्ष आसिफ, गाडेकर, अमर दिवनाले, अकोला तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड, शेख रशीद, पातूरचे प्रवीण आगरकर, बाळापूरचे जवाद अहेमद, शिक्षण विभागातील सुनिल जानोरकर, प्रशांत अंभोरे, सतीश देशमुख उपस्थित होते.