पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची तयारी; चंद्रभागा स्नानासाठी सुरक्षेचे नियोजन सुरू, प्रशासन सज्ज
Ashadhi Wari Sohla 2025: आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात चंद्रभागा नदीत स्नान करणे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत नदी पात्रात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.वारकरी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रभागा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात झाला, त्यानंतर किती वाळवंट शिल्लक राहील याचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करून सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. हरसुरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी घोडके, मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.