हिप फ्रॅक्चरला कारणीभूत ठरतोय मेनोपॉज? (फोटो सौजन्य - iStock)
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचे प्रमाण अधिक आहे. हा वाढलेला धोका मुख्यत्वे हार्मोनल बदलांमुळे, महिलांमध्ये हाडांची घनता कमी झाल्यामुळे पहायला मिळतो. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन पातळीमध्ये अचानक घट झाल्यामुळे हाडांचे नुकसान होते, हाडांची रचना कमकुवत होते आणि हाडं तुटणे आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांचा धोका समजून घेणे आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पुणे येथील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले की, हिप फ्रॅक्चर हे बहुतेकदा हाडांमधील कमकुवतपणा, पडल्यामुळे किंवा किरकोळ दुखापतीमुळे होते. मांडीचे हाड जेव्हा ते तुटते तेव्हा ते एखाद्या व्यक्तीच्या शारीरीक हालचालीवर परिणाम करते. त्यामुळे त्या व्यक्तीला दैनंदिन कामांकरिता इतरांवर अवलंबून रहावे लागते. लक्षणांमध्ये मांडीला अचानक वेदना होणे, पायावरील भार सहन न होणे, स्नायुंमधील ताठरता, जखम होणे आणि हाडांची घनता कमी होणे यांचा समावेश आहे. गतिहीनता, संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या आणि काही प्रकरणांमध्ये कायमचे अपंगत्व किंवा इतर गुंतागुंतीचा समावेश असून शकतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये नितंबाचे(हिप) फ्रॅक्चर हे सामान्यतः कमी इस्ट्रोजेन पातळीमुळे होऊ शकते, जे हाडांमधील बळकटी कमी करते. इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात. महिलांमध्ये नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा हाडांची घनता कमी असते, ज्यामुळे त्यांची हाडे अधिक नाजूक होतात आणि वयानुसार फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते.
पुरुष किती वयापर्यंत होऊ शकतात ‘बाप’, पुरुषांनाही होतो का मेनोपॉज
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. अरबट पुढे म्हणाले की, सुमारे २०% महिलांना रजोनिवृत्तीनंतर हिप फ्रॅक्चरचा धोका असतो. गेल्या दोन महिन्यांत, ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २ ते ३ महिलांनी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली आहे. उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, त्यानंतर पुनर्वसन, फिजिओथेरपीचा समावेश आहे. सध्या, प्रगत असे सुपरपॅथ तंत्र जे संपूर्ण हिप रिप्लेसमेंटसाठी एक नवीन, कमीत कमी आक्रमक मार्ग उपलब्ध करुन देते.
कशी आहे प्रक्रिया
ही एक लहान छिद्र पाडून केली जाणारी प्रक्रिया असून यामध्ये स्नायू आणि ऊतींचे नुकसान कमी होते ,ज्यामुळे जलद पुनर्प्राप्ती, कमीत कमी वेदना आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो. ही पद्धत शस्त्रक्रियेनंतरच्या सामान्य समस्या जसे की हिप डिस्लोकेशन आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करते.
स्नायू आणि स्नायुबंध जतन करून, ही तंत्र अधिक नैसर्गिकरित्या सांध्यांची हालचाल करण्यास मदत करता येते , ज्यामुळे दीर्घकालीन परिणाम सुधारतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण स्वतंत्रपणे चालू शकतात आणि मांडी घालून बसणे यासारख्या सामान्य क्रिया देखील पुर्ववत करु शकतात. या सुरक्षित आणि प्रभावी तंत्राने रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यास मदत होत आहे.
कशी घ्यावी काळजी
प्रतिबंध हा सर्वोत्तम मार्ग असून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन टाळणे आणि वयानुसार हाडांची घनता चाचणी करुन गरजेचे आहे. रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांसाठी, डॉक्टर हाडांना बळकटी देणारी औषधे लिहून देण्याचा विचार देखील करू शकतात. तसेच पडण्यासारखे किरकोळ अपघात टाळण्यासाठी घरगुती सुरक्षा उपाय जसे की हँडरेल्स बसवणे आणि योग्य प्रकाशयोजना वापरणे हे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात असेही डॉ. अरबट यांनी स्पष्ट केले.