सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल’, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या घोषणेने संकटात सापडलेल्या विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. याअगोदर महायुतीकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची स्वतंत्र मदत देण्यात आली होती.
महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली
दिवाळीपूर्वी येणारे नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतो. राज्यात विदर्भ, मराठवाड्यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भाचा विचार केला तर वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते. तर एकट्या पश्चिम विदर्भात ७१ अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार, असे वचन दिले. आता सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्याने सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला गेला आहे.
दिवाळी आणि नंतरच्या दिवसांतील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था साधारणत: सोयाबीनच्या उलाढालीवर होत असते. नेमक्या याच पिकासाठी दिलासादायी घोषणा होत असल्याने समाधान व्यक्त होऊ लागला असल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने दिली.
बाजारावरही सकारात्मक परिणाम दिसणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजना आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केल्याने बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसणार आहे. दिवाळीच्या दिवसांतच हे घडल्याने शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही या घोषणांच्या अनुषंगाने नियोजन करू लागला आहे. सरकारी दरासोबतच खुल्या बाजारातही सोयाबीनला अधिक दर मिळण्याची चिन्हे यानिमित्ताने असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात सोयाबिनला 6000 रुपये दर दिल्याने याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. राज्यात विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबिन उत्पादक शेतकरी आहे त्यामुळे तेथील शेतकरी या निर्णयाकडे कसे पाहतो हेही तितकेच महत्वाचे असणार आहे.
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहचला असताना, आता महायुतीकडून शेतकऱ्यांना मोदी सरकारने घोषित केलेल्या हमीभावाचा मुद्दाही चर्चेत आणला जाईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.