संग्रहित फोटो
पुणे : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात. एसटी (राज्य परिवहन बस) आणि रेल्वेच्या तिकिटांची गर्दी आणि तिकीट मिळण्यात होणारा अडथळा यामुळे अनेकांना खासगी ट्रॅव्हल बसचा आधार घ्यावा लागत आहे. याच संधीचा फायदा घेत खासगी बस ऑपरेटरांनी प्रवाशांकडून तब्बल दुप्पट–तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते नांदेड या मार्गाचे भाडे १६०० ते १७०० रुपये इतके आकारले जात आहे, तर एसटी बसचे भाडे फक्त ८३० रुपये आहे. आकोल्यासाठी १९०० ते २००० रुपये, आकारले जात आहे. एसटी भाडे ८३० आहे. नागपूरसाठी २००० ते २२०० रुपये आकारले जात आहे. एसटीचे भाडे १२५२ इतके आहे. आणि लातूरसाठी १५०० ते २००० रुपये इतके दर आकारले जात आहेत. एसटीचे भाडे ५८० आहे. इतरही मार्गांवर अशीच दरवाढ करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागांत मराठवाडा व विदर्भातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातून प्रवाशांची गर्दी वाढली असून, एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बससेवाही सुरू करण्यात आली आहे. तरीसुद्धा तिकिटांची कमतरता भासल्याने खासगी बसवाल्यांची चांदी झाली आहे. प्रवाशांनी शक्यतो एसटी बस किंवा रेल्वेचे तिकीट वेळेत आरक्षित करावे, अन्यथा मनमानी दरांचा फटका बसू शकतो, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
परिवहन बस खाजगी बस
नांदेड ८३० १६०० ते १७००
अकोला ८३० १५०० ते १६००
नागपूर १२५२ २५०० ते २६००
बुलढाणा ६७० १६०० ते १७००
सोलापूर ४५८ ११०० ते १२००
दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारू नये. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी जादा भाडेदर आकारणीबाबत तक्रार करायची असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक व तिकिटाचा फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे