फोटो सौजन्य - Social Media
कोकणातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. विशेषतः वानर आणि माकडांच्या उपद्रवामुळे फळबागा आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, याला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्याचे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांशी झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री नाईक होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग, कोल्हापूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, तसेच दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजन, पत्रकार मिलिंद लिमये आणि वन्यजीव अभ्यासक संतोष महाजन उपस्थित होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास आणि अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
बैठकीदरम्यान विनायक महाजन यांनी दापोलीत रानडुकर, माकडे आणि वानरांमुळे होत असलेल्या शेतीच्या नुकसानीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आता माकडे गावात घुसून घरातील वस्तूंचेही नुकसान करत आहेत. या समस्येचे समाधान म्हणून वनमंत्री नाईक यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रानडुकरांमुळे फळबागा आणि भातशेतीचेही नुकसान होत असून, शेतकऱ्यांना याविरोधात कायदेशीर चौकटीत राहून कार्यवाही करण्यासाठी अनुमती द्यावी, असे निर्देशही वनमंत्री नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पूर्वी वितरित केलेले शस्त्र परवाने निलंबित झाल्याने, नव्याने नियमानुसार शेतकऱ्यांना परवाने द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. शेवटी, महाजन यांनी वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी, तसेच साळिंद्र प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचाही विचार भरपाईत व्हावा, अशी मागणी केली.