राजापूर: कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery Project) सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण केलं जाणार होतं. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कशेळी बांध येथे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. याठिकाणी पोलीस व्हॅन उलटून (Police Van Accident) 17 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Ratnagiri Accident) दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.
विरोधी संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना अटक
दरम्यान, आज कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज देऊनही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज या मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापण्याची चिघळण्याची चिन्हे आहेत. कोकणातील बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल (सोमवारी) राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्यासोबत आणखी दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना रत्नागिरीत ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
आंदोलनक आंदोलनावर ठाम…
रिफायनरीला विरोध केल्यामुळे पोलिसांनी काल वैभव कोळवणकर यांना अटक झाल्यानंतर आंदोलकांचे अटकसत्र सुरूच आहे. बारसू आंदोलन स्थळावरून पोलिसांनी प्रसारमाध्यमांना हटवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध पहावयास मिळत आहे.
144 कलम लागू
या पार्श्वभूमीवर परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं असून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामूळे सर्व मीडिया प्रतिनिधीनाही प्रस्तावित सर्वेक्षणाचे ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय त्या परिसरात जाऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित भू सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडियाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने 1) सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा 2) मंगेश चव्हाण या दोघांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 153(1) प्रमाणे ताब्यात घेऊन ते दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम 151(3) प्रमाणे मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश केले आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.