पाटस / राजेंद्र झेंडे : नगर जिल्ह्यातील प्रवरा तालुक्यातील सुगाव बंधाऱ्यात 22 मे रोजी दोघेजण बुडाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला अर्थात एसडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्या दोघांना शोधता शोधता पाच जवानांची बोट उलटली आणि त्यातीलही तिघेजण या घटनेत मृत झाले. यामध्ये दौंड तालुक्यातील कौठडीचे फौजदार प्रकाश शिंदे यांचाही समावेश आहे. या घटनेने दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळ्याच्या गट क्रमांक सहामध्ये एसडीआरएफ पथकातील फौजदार शिंदे, वैभव वाघ व राहुल पावारा या तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. 22 मे रोजी नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या सुगाव बंधाऱ्यात दोघेजण बुडाले होते. त्यांचा शोध लागत नव्हता. त्यांचा शोध लावण्यासाठी एसडीआरएफचे पथक बोलविण्यात आले होते. त्यामध्ये या तिघांचा समावेश होता.
या पथकाने एकाचा शोध लावला. मात्र, या दरम्यान दहा जणांच्या या बोटीत पाच जण उलटले आणि तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने नगर जिल्ह्यातही आणि धुळे जिल्ह्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सकाळी घडलेल्या घटनेची माहिती दुपारनंतर जेव्हा सगळीकडे पसरली, तेव्हा या तिघांमध्ये दौंड तालुक्यातील कौठडी गावचे फौजदार प्रकाश शिंदे यांचाही समावेश असल्याचे समजताच दौंड तालुक्यातही शोककळा पसरली.