मुंबई : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सर्वत्रच रंगली आहे. या निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापले असून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा आमने सामने आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीचे मतदान ३ नोव्हेंबर रोजी पारपडणार असून या दिवशी मतदान असल्याने मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रासाहसनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) मोठी चुरस निर्माण झाली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवार अर्ज दाखल केला.