PMC Election 2026: अमोल बालवडकरांचे स्फोटक भाषण; पुणे महापालिकेच्या कारभारावर अजित पवारांनी डागली तोफ
Pune Municipal Corporation Election 2026: प्रभाग क्रमांक ९ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी संकल्प सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सभेचे वातावरण अत्यंत उत्साही असून या वेळी अमोल रतन बालवडकर यांच्या भावनिक व आक्रमक भाषणाने संपूर्ण सभा भारावून गेली.
यावेळी अमोल रतन बालवडकर यांनी गेली अकरा वर्षे तन-मन-धन अर्पण करून पक्षवाढीसाठी व समाजसेवेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दांत निषेध केला. शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारून सामान्य कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न झाला, हा प्रकार म्हणजे राजकीय हत्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी नाकारल्यानंतर घरी कसे जायचे, आई-वडिलांना काय सांगायचे, असा प्रश्न उभा राहिल्याचे सांगत त्यांनी त्या काळातील मानसिक संघर्ष मांडला.
बालवडकर म्हणाले की, त्या निर्णायक क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. “अजितदादांनी माझ्यावर अन्याय झाल्याचे स्पष्टपणे मान्य केले आणि चर्चेसाठी बोलावले. त्या एका भेटीत मला राजकीय पुनर्जन्म मिळाला,” असे त्यांनी सांगितले. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची असून अजूनही कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व राज्यात आहे, ते म्हणजे अजित पवार, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात पुणे महानगरपालिकेच्या अपयशी कारभारावर जोरदार टीका केली. वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते, खड्डे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, अनियमित पाणीपुरवठा आणि वाढते प्रदूषण यामुळे पुणेकर त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. धरणे जवळ असूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आरोग्य व शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क असून, त्यासाठी सक्षम व जबाबदार कारभारी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवारांचे कौतुक करत सांगितले की, गायत्री मोहन मेढे, बाबुराव दत्तोबा चांदेरे, पार्वती अजय निम्हण आणि अमोल रतन बालवडकर यांनी सातत्याने प्रभागातील सामाजिक, नागरी व विकासात्मक प्रश्नांसाठी काम केले आहे. या सर्व उमेदवारांचे काम जनतेला दिसत असून, परिवर्तनासाठी त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विजयी संकल्प सभेतून प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






