तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल
नवी दिल्ली : महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता देशात पश्चिम बंगालसह महत्त्वाच्या 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार आहे. सध्या निवडणूक आयोग विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच काही राज्यांतील एसआयआर अर्थात मतदार यादी पुनर्रीक्षणाच्या कामातील त्रुटी दूर करण्यात येत आहेत. हे काम झाल्याबरोबर निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२१ च्या तुलनेत यावेळी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यास थोडा उशिर लागला आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये २६ फेब्रुवारी रोजीच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.
दरम्यान, लोकशाहीच्या उत्सवात तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांवर आयोग विशेष लक्ष देणार आहे. मतदारांसाठी मतदान करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने मतदान केंद्रांची रचना व घरापासूनचे अंतर ठेवण्यावर भर देतानाच मतदारांना आपला अधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यावरही आयोग लक्ष देणार आहे.
राज्यसभेची अनेक पक्षांकडून तयारी सुरु
दुसरीकडे, पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी दुसरीकडे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी तयारी सुरु आहे. यातील एका जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असून, राज्यसभेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार, यावर अजूनही एकमत झालेले नाही. राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे. शरद पवार मोठे नेते, पण आम्ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका सरदेसाई यांनी व्यक्त केली.
हेदेखील वाचा : शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची






