संग्रहित फोटो
अगदी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट तयार झाले. कार्यकर्तेही दोन गटात विभागले गेले. स्वतंत्र सभा, बैठका झाल्या. त्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. पवारसाहेबांचे वय झाले आहे, आता त्यांनी थांबावे अशी भाषणे झाली. भाजप विचारधारेशी कधीच जमवून घेणार नाही असे शरद पवार म्हणाले. लोकसभा, विधानसभा निवडणुका एकमेकांविरुद्ध लढविल्या. आता वेगळे चित्र दिसू लागले. दोन्ही पवार पुण्यात एकत्र येत आहेत. या युतीला भाजपची संमती आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. सत्तेतील मित्र पक्षांच्या विरोधात भाजप उमेदवारांना लढायचे आहे.
सोलापूरमध्ये शिंदे आणि अजित पवार यांची युती झाली असून, भाजप त्यांच्या विरोधात आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे एकत्र असून ते अजित पवार यांच्या विरोधात आहेत. मुंबईत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे बंधूंबरोबर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार एकत्र आणि त्यांची लढाई भाजपशी. महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही विस्कळीत आहेत. प्रत्येक गावा-गावात वेगवेगळ्या पक्षांची युती किंवा आघाडी होताना दिसत आहे. त्यामुळे नेमकी कोणती विचारधारा स्वीकारायची याविषयी कार्यकर्तेच गोंधळलेले आहेत.
निवडणूक निकालानंतर महापालिकेत सत्तेसाठी भाजप, शिंदे, पवार एकत्र येणार आहेत आणि सत्तेची संधी मिळत असेल तर काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे एकत्र येण्यास तयार असतील. या सगळ्या साठमारीमुळे जे पराभूत होणार आहेत, ते आपल्या माणसांकडूनच पराभूत होणार आहेत आणि राजकारणातून बाद होणार आहेत.
या सर्व गोंधळात रवींद्र धंगेकर यांची कोंडी झाली, अशा बातम्या आहेत. शिवसेना, मनसे असे फिरत फिरत तीन वर्षांपूर्वी धंगेकर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून नुकतेच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. या सगळ्या राजकीय प्रवासात त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना दुखावले. भाजप आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाची बोलणी पुण्यात झाली. तेव्हा त्यातून धंगेकरांना दूर ठेवण्यात आले. दरम्यान धंगेकर यांच्या मुलाने निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आणि वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. एकूणच धंगेकरांची कोंडी झाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.






