सौजन्य - नवराष्ट्र टीम
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातून शेतमजुरांना घेऊन एक पिकअप गाडी (क्रमांक एम एच १६सी. डी ८१५५) ही आळेफाटाच्या दिशेने जात होती. दरम्यान, समोरून (कल्याणच्या दिशेने) येणाऱ्या कात्रज दूध संघाचा गाडी क्रमांक (एम एच १२ एक्स एम ६१२१) आणि पिकअपची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेलजवळ समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, पिकअपमधील मजूर रस्त्यावर फेकले गेले आणि गाड्यांचा चक्काचूर झाला. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही महिला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील रहिवासी आहेत.
वंदना गणेश हिल्लम (वय २०, रा. खुट्टल, ता. मुरबाड), २) मंदा शिवराम हिल्लम (वय ३५, रा. तळेगाव, ता. मुरबाड) अशी या अपघातात मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. अपघात होताच डुंबरवाडीतील स्थानिक नागरिक आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
दरम्यान या अपघातातील पिकअप चालक, दूध टँकरचालक आणि काही गंभीर जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात व मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ओतूर, बगाडवाडी, अकोले, पाचघर, निमगिरी, लहाळी, टोकवडा, फोफसंडी, मांडवे आणि बल्लाळवाडी येथील सुमारे २६ महिला व पुरुष मजुरांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती डॉ. श्रीहरी सारोकते व प्रशांत गोरे यांनी दिली. अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






