अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाची सुरुवात पहाटेपासूनच करत असतात. पुण्यात पहाटेपासून अजित पवार यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला होता. गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सकाळी अजित पवार यांनी नियोजित वेळेच्या आधी केलं. त्यामुळं पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. त्यांनी अजित पवारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अजित पवार यांनीही ताणून न धरता पुन्हा उद्घाटन करण्याचा सल्ला दिला.
यासंदर्भात खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ‘मी वेळेच्या दहा मिनिटांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते. मात्र, त्याच्या आधीच अजित दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हे करण्यात आलं. नक्कीच मला वाईट वाटलं. जी वेळ घोषित केलेली असते, त्याच्याच आधी आम्ही हजर होतो. मात्र, त्याच्या आधी जर उद्घाटन होत असेल तर निमंत्रण पाठविण्यात काहीच अर्थ नाही. अजित दादा आमचे मोठे दादा आहेत. त्यांना माझी विनंती राहील की तुम्ही रात्रीची, पहाटेची वेळ घोषित करा. आम्ही वेळेत येऊ पण वेळेच्या आधी उद्घाटन करू नका’.
तसेच, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची इमारत होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावं, असं वाटत असतं आणि असं असताना जर सहभागी होता आलं नाही तर नक्कीच वाईट वाटतंर, असं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.
दादांनी एक आदर्श महाराष्ट्राला घालून दिला
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ‘निमंत्रण दिलेले जे-जे आहेत, ते-ते हजर राहू शकतात. नेत्यांच्यापेक्षा त्यांच्या टीमने काळजी घेतली पाहिजे. मी साडे सहाच्या दहा मिनिटे आधीच तिथं हजर होते. दादांना एवढीच विनंती आहे की, दादांनी जी वेळ दिली आहे. त्याच वेळेवर उद्घाटन करावं ही त्यांना विनंती आहे. दादांनी वेळेत कार्यक्रम करण्याचा एक आदर्श महाराष्ट्राला घालून दिला आहे. आणि ते पाळताना आम्हाला देखील खूप छान वाटतं, असं देखील यावेळी मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.