रोहित पवार यांची फडणवीस यांच्यावर टीका (फोटो- टीम नवराष्ट्र)
पिंपरी : राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. सर्वत्र उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यातच रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कुठेतरी उत्तर प्रदेशचा प्रभाव महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांवर झाल्याचे दिसत आहे. बटेंगे तो कटेंगे अशी जी काही वक्तव्य येत आहेत ती गुजरात, उत्तर प्रदेश वरून आलेली वाक्य आहेत. हे गुजरातशाही महाराष्ट्रावर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या नेत्यांना आम्हाला एवढेच सांगायचे आहे. आम्ही मराठी माणसे आहोत. आजच्या भाजपच्या याच धर्माच्या चक्रव्यूहामध्ये गरीब माणूस अडकलाय. त्या गरीब माणसाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याबद्दल तुम्ही काय करता ते दाखवा असे रोहित पवार म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सर्वात मोठे खोटारडे नेते असून तेच खोटा नरेटीव्ह पसरवत असल्याचा आरोप पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भोसरी उमेदवार अजित गव्हाणे उपस्थित होते.
महाविकास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भोसरी विधानसभा उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार भोसरीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भोसरी हा उद्योग धंदे असणारा परीसर आहे . या ठिकाणचे कारखाने गुजरातला पळवणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत . हे वाचविण्यासाठी नागरिक महाविकास आघाडी सोबत असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशातील एक मोठे नेते राज्यात येऊन सभा घेत आहेत. यांच्या सभेला फक्त तीन हजार लोक होती. युपी, गुजरातचे नेते राज्यात बटेंगे तो कटेंगे अशी वक्तव्य करत आहेत, मुस्लिम-हिंदू असे वाद निर्माण करत आहेत. मात्र महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आमचे विचार पुरोगामी आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिक याला बळी पडणार नाहीत.
महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे. यांनी शिवाजी महाराजांचा पुतळाही सोडला नाही. राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून 180 जागा निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सर्वात जास्त खोटे बोलणारे नेते आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा: “माता-भगिनी, कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी धारकरी…”; महेश लांडगेंचा विरोधकांना गर्भित इशारा
1500 कोटींचा होतोय भ्रष्टाचार…
पिंपरी चिंचवड महापालिकेचे वार्षिक बजेट 8 हजार कोटी रुपयांचे आहे. यामध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
पोलिसानी व्यवस्थित काम करावे…
आमच्या पक्षाचे, उमेदवारांना प्रचार करताना अडथळा निर्माण केला जात आहे. झेंडे काढून टाकले जातात. कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पोलीस साथ देत आहेत. अशा पोलिसांची नावे आमच्या प्रयत्न आले आहेत. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर नक्किच यांच्याकडे पाहिले जाईल असेही पवार म्हणाले.