संग्रहित फोटो
शिरुर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील कोळपेवस्ती परिसरात भावकीतील किरकोळ वादातून भयानक हाणामारी झाली असून, यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. डोक्यावर कोयत्याने वार, लोखंडी रॉड, तलवारीसदृश हत्यारे आणि दगडांनी केलेल्या हल्ल्यात महिलांसह अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी (ता. ८ ऑक्टोबर) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश लॉन्सजवळ घडली आहे.
याप्रकरणी १४ जणांसह ५ ते ६ अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळपेवस्ती येथील धनगर समाजाच्या वार्षिक देवकार्याच्या निमित्ताने मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर, जेवणावरून दादा कोळपे आणि शहाजी कोळपे यांच्यात किरकोळ वाद झाला. रात्री घरी परतल्यानंतर तोच वाद विकोपाला गेला.
रात्री साडेआठच्या सुमारास दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे यांच्यासह १३-१४ जणांनी तात्या भाऊसो कोळपे यांच्या घरी येऊन, “तू आमच्याशी देवकार्याच्या कार्यक्रमात वाद का घातलास?” असे म्हणत दादा कोळपे यांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. तात्या कोळपे यांना वाचविण्यास आलेले परसराम कोळपे यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आवाज ऐकून बाहेर आलेले गंगाराम कोळपे यांच्यावर तलवारीसदृश हत्याराने हल्ला करण्यात आला. शहाजी कोळपे यांनी धुळा कोळपे यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला. महिलांनाही दगड व हातांनी मारहाण झाली.
हॉस्पिटलमध्येही पाठलाग व हल्ला
जखमींना तत्काळ वरदविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी जात असताना भिवा कोळपे यांच्यावर सोन्या उर्फ तुषार खैरे (रा. शिरसगाव काटा) याने पांढऱ्या कारमधून पाठलाग करत चाकूने हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी थेट हॉस्पिटलमध्ये घुसून मनिषा कोळपे यांना पोटात लाथ मारून गंभीर दुखापत केली.
पुढील तपास सुरू
तात्या कोळपे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, भैरू कारभारी कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे, बाबुराव विठ्ठल कोळपे, धुळा विठ्ठल कोळपे, सिद्धेश्वर शिवाजी कोळपे, शिवाजी कारभारी कोळपे, धुळा बाबू थोरात, भिवा बाबू थोरात, सोन्या उर्फ तुषार खैरे यांच्यासह दोन महिलांवर आणि ५ ते ६ अनोळखी व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.