ड्रग्स फ्री पुण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न (फोटो -istockphoto)
पुणे: ‘ड्रग्ज फ्री समाज’ व ‘ड्रग्ज फ्री पुण्या’साठी पुणे पोलिसांचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने पोलिसांची कारवाई तीन स्तरावर सुरू असून, विक्रेते, पिणारे तसेच उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षात कारवाईकरून ७५ गुन्ह्यात जप्त केलेले जवळपास ७ कोटी ७६ लाख रुपयांच्या ८०० किलो ग्रॅम ड्रग्ज रांजणगाव येथील कारखान्यात नष्ट करण्यात आले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदंर्भाने माहिती दिली. यावेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांनी कारवाईकरून तस्करांकडून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पकडले. जवळपास ७५ गुन्ह्यातील हे ड्रग्ज नष्ट करण्याची न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर मंगळवारी ते नष्ट करण्यात आले. मेफेड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एलएसडी, गांजा असा ड्रग्जचा यात समावेश होता.
वर्षभरात ३६०० कोटींचे ड्रग्ज जप्त
गेल्या वर्षी पोलिसांनी ३६०० कोटींचे एमडी हा ड्रग्ज पकडले. तो नष्ट करण्याचीही अंतिम तयारी सुरू असून, येत्या दीड ते दोन महिन्यात नष्ट होईल, असेही यावेळी अमितेशकुमार यांनी सांगितले. या गुन्ह्यात प्रमुख आरोपी संदीप धुनिया हा नेपाळमार्गे परदेशात पळून गेला आहे. तो अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. हा गुन्हा आता एनसीबीकडे तपासाला वर्ग केला असून, धुनियाचा परदेशात शोध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलिसांचे प्राधान्य असून, त्यादृष्टीने कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले.
विधानसभेत योगेश कदमांनी नेमके काय सांगितले?
राज्य शासनाने ड्रग्सविरोधी कारवाईत झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत ड्रग्ज रॅकेटमध्ये एखादा पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्याला तत्काळ पदावरून बडतर्फ करण्यात येईल. तसेच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. याबाबत सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य मनीषा चौधरी, योगेश सागर, बाळा नर, सुनील प्रभू यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Yogesh Kadam: “ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना…”; विधानसभेत योगेश कदमांनी नेमके काय सांगितले?
गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, राज्यात अंमली पदार्थाची तस्करी तसेच जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये कारवाई करण्यात येते. राज्यात २०२४ मध्ये अंमली पदार्थ कायद्यांतर्गत सेवनार्थीच्या विरुद्ध १५८७३ गुन्हे दाखल असून १४२३० आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच अंमली पदार्थ ताब्यात बाळगणे, वाहतूक करणे संदर्भात एकूण २७३८ गुन्हे दाखल झालेले असून ३६२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ४२४०.९० कोटी किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. राज्यात अंमली पदार्थांच्या व्यापारास व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्व पोलीस घटकामध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केलेले आहेत.