सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मुंबई, पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यात होतील, असे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार आहेत. असे असले तरी स्वबळावर की युती म्हणून याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनेही जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच पुणे भाजपा शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा नियुक्ती केली. भाजपमध्ये फेरनियुक्ती केल्यानंतर घाटे यांनी पुण्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. सरचिटणीसपदी रविंद्र साळेगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. तर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दुष्यंत मोहोळ यांची नियुक्ती केली आहे.
२२ जणांच्या कार्यकारणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या कार्यकारणीत मागील कार्यकारणीत पदाधिकारी असलेल्या दोघांना संधी दिली आहे. पुण्यातील कोथरुड आणि शिवाजीनगर भागातील प्रत्येकी १ पदाधिकाऱ्याला पुन्हा नव्या कार्यकारणीत संधी दिली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची पुणे शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दुष्यंत मोहोळ तर महिला मोर्चा अध्यक्षपदी माजी नगरसेविका मनीषा लडकत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर उपाध्यक्षपदी आठ जणांची तर सरचिटणीसपदी चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर भाजप चिटणीसपदीही आठ जणांची नियुक्ती केली आहे. भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चा अध्यक्षपदीही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारणी जाहीर केली.
भाजपच्या शहर उपाध्यक्षपदी शशिधर पुरम, सचिन मोरे, अर्जुन जगताप, संदीप दळवी, विठ्ठल चराटे, सुनील पांडे, मनोज खत्री, आनंद रिठे यांची तर सरचिटणीसपदी रवींद्र साळगावकर, पुनीत जोशी, विश्वास ननावरे, प्रियांका शिंदे शेंडगे यांची नियुक्ती केली आहे. शहर भाजप चिटणीसपदी राज परदेशी, अनिल नवल, गणेश पल, समीर रुपदे, डॉ. अनुराधा बेडके, संगीता गवळी, स्मिता खेडकर, रुपाली धाडवे यांची नियुक्ती केली आहे.