अपघात रोखण्यासाठी आरटीओची कडक मोहीम (फोटो- सोशल मीडिया)
नवले ब्रिजवर वाढले अपघातांचे प्रमाण
वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार
आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची केली पाहणी
पुणे: नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे–सातारा महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दोन भरारी पथके तैनात केली आहेत. शनिवारपासून (ता. २२) जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मद्यप्राशन तपासणी तसेच वाहनांची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे.
नुकतीच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची पाहणी करून तपासणीसाठी ठेवलेल्या जागेचा आढावा घेतला. खेड शिवापूर टोलनाक्यावरील ‘वे ब्रिज’जवळ वाहनांना थांबवून तपासणी केली जाणार आहे.
Navale Bridge Accident: वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष; बेशिस्त ५८ हजार वाहनधारकांवर कारवाई
चालकांचे समुपदेशनही
अपघात टाळण्यासाठी केवळ कारवाई न करता वाहनचालकांचे समुपदेशनही केले जाणार आहे. कात्रज घाटातील तीव्र उतार, न्यूट्रलवर वाहन चालवू नये, वेग नियंत्रणात ठेवावा, अशा मार्गदर्शन सूचना मोटार वाहन निरीक्षकांकडून चालकांना दिल्या जाणार आहेत. जडवाहतूक करणाऱ्या चालकांचा पूर्ण बॉडी चेकअपही करण्यात येईल.
दोन दिवसांत शंभर वाहनांवर कारवाई
महामार्गावरील वायुवेग पथकाने गेल्या दोन दिवसांत लेन कटिंग, वेगमर्यादा उल्लंघन, पासिंग संपलेले इत्यादी कारणांवरून शंभरहून अधिक वाहनांवर कारवाई केली असून, दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली. शनिवारपासून ही मोहीम अधिक गतीने राबविण्यात येणार आहे.
२२ दुचाकी चालकांवर कडक कारवाई
वायुवेग पथक क्रमांक १ ने शुक्रवारी विभागीय आयुक्तालयात हेल्मेटशिवाय येणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर कारवाई केली. नवले पुलावरील अपघातानंतर महामार्गासह शहरातही आरटीओने कडक मोहीम सुरू ठेवली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले.
Pune News: पुण्यात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; ‘नियमांचे पालन न केल्यास…’, RTO ने दिला ‘हा’ इशारा
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कारवाईबरोबरच चालकांचे समुपदेशन आणि शारीरिक तपासणीही आवश्यक आहे. शनिवारपासून याची अंमलबजावणी सुरू करणार आहोत.
– अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे






