गणेशमूर्तीला सजीव करणारे डोळे रेखाटणे बनतंय एक आव्हान; मूर्तीचे रंगकाम जबाबदारी आणि जोखमीचे
पुणे / प्रगती करंबेळकर : कुंज कुंज डोळे तुझे, सुपाएवढे कान, पार्वतीचा गणपती दिसतो किती छान या ओळींप्रमाणे गणेशमूर्तीतील डोळेच तिला सजीव करतात. मूर्तीवर रंग चढवणे म्हणजे फक्त सौंदर्यवर्धन नव्हे, तर भक्तांच्या श्रद्धेला मूर्त स्वरूप देणे असते. या नाजूक कलाकृतीतून बाप्पाला जिवंत भासवणारे काम करणारे रंगशिल्पकार अनुपम मुकेरकर यांनी विशेष संवाद साधत रंगकामाचे महत्त्व आणि आव्हान सांगितले.
मुकेरकर कुटुंबाची ही तिसरी पिढी असून, त्यांच्या आजोबांनीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्ती रंगवण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजही त्यांनी जपली आहे. रंगकामाबद्दल बोलताना अनुपम म्हणतात, ‘गणेशमूर्ती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असते. त्यामुळे मूर्तीतील चेहरा, भाव आणि रंग यांमध्ये किंचितही चूक होता कामा नये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दगडूशेठ गणपतीचा ठरलेला चेहरा परिचित आहे. त्यात जरासा फरक पडला तरी लोकांना तो दगडूशेठ वाटणार नाही’.
गणेशमूर्ती रंगवताना कलाकाराला अनेक तांत्रिक जोखमींचा सामना करावा लागतो. मूर्तीच्या शरीराला रंग देण्यासाठी पारंपरिक वॉटरकलरचा वापर होतो. हा रंग टिकावा, त्यात योग्य छटा मिळावी यासाठी खास प्रक्रिया करावी लागते. त्यात थोडाही फरक पडला तरी मूर्तीचा संपूर्ण भाव बदलतो. रंगाचे अचूक संयोजन साधणे, नक्षीकामात नेमकेपणा ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांची आखणी हे सगळे घटक एकत्र येऊनच मूर्ती परिपूर्ण होते.
गणेशमूर्तीला जीवंतपणा देणारे म्हणजे त्याचे डोळे
पुढे त्यांनी सांगितले की, गणेशमूर्तीला जीवंतपणा देणारे म्हणजे त्याचे डोळे. भाविकांना तो बाप्पा पाहतोय, अशी जाणीव व्हावी, यासाठीच डोळ्यांची रचना घडवतो. प्रत्येक वेळी डोळे रंगवताना हातापेक्षा मन आणि श्रद्धाच जास्त काम करत असते. मी बाप्पाकडे इतकीच प्रार्थना करतो की ही जबाबदारी पार पाडताना माझ्याकडून चूक होऊ नये.
गणेशमूर्ती रंगकाम ही स्वतंत्र कला
गणेशमूर्ती रंगकाम ही स्वतंत्र कला आहे. मूर्ती तयार करणाऱ्या शिल्पकाराच्या हातून आकार मिळतो, पण त्या मूर्तीला जीवन देणारे रंग हे रंगशिल्पकाराचे योगदान असते. रंगांच्या अचूक छटा, कपाळावरील तिलक, भालचंद्राची रचना, नक्षीकामातील बारकावे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांचा भाव हे सारे घटक मिळून गणेशमूर्तीचे सौंदर्य पूर्णत्वाला जाते. या कलाविश्वात धैर्य, संयम आणि भक्तिभाव तितकेच आवश्यक आहेत.
आजोबा, वडिलांकडून शिकलेली परंपरा जपली
आम्ही आजोबांकडून आणि वडिलांकडून शिकलेली परंपरा जसंच्या तशी जपली आहे. नवनवीन प्रयोग करतो, कधी यशस्वी होतात तर कधी चुका होतात. पण त्या सुधारण्याची शक्ती बाप्पाच देतो. हीच आमची खरी साधना असल्याचे अनुपम यांनी सांगितले.