संग्रहित फोटो
पिंपरी/विजया गिरमे : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आपले दाहक रूप दाखवायला सुरुवात केली आहे. दुपारच्या सुमारास उष्णतेचा पारा ३४ अंशाच्या पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत असून, नागरिकांना घराबाहेर पडणे असह्य होऊ लागले आहे. अशा या कडक उन्हात घशाला पडलेली कोरड शमवण्यासाठी आता ठिकठिकाणच्या चौकात घुंगरांचा आवाज घुमू लागला असून, अबालवृद्धांची पावले आपोआप रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत.
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा
साधारणतः मार्चमध्ये उन्हाळ्याला सुरुवात होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाडा जाणवू लागला आहे. यावर्षी देखील मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता शीतपेये आणि विशेषतः उसाचा रस मोठा दिलासा देत आहे.
कृत्रिम पेयांपेक्षा नैसर्गिक रस ‘स्वस्त आणि मस्त’
बाजारात सध्या विविध प्रकारची रंगीत आणि कृत्रिम घटक वापरून तयार केलेली शीतपेये उपलब्ध आहेत. ही पेये प्यायल्यानंतर क्षणभर थंडावा मिळत असला, तरी आरोग्याच्या दृष्टीने ती घातक ठरू शकतात. याउलट, उसाचा रस हा पूर्णपणे नैसर्गिक असून तो खिशालाही परवडणारा आहे. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी उसाचा रस हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.
आरोग्यासाठी ‘अमृत’ की ‘धोका’?
तज्ज्ञांचे मत : उसाचा रस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असला, तरी तो पिताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:
फायदे : उसाच्या रसात मुबलक प्रमाणात खनिजे असतात. हे पेय यकृतासाठी पोषक असून नैसर्गिक साखर असल्याने शरीरातील थकवा झटकन दूर होतो.
बर्फाचा वापर टाळावा : उसाचा रस विशेषतः बर्फाशिवाय प्यायल्यास तो शरीराला अजिबात अपायकारक ठरत नाही. रसवंतीगृहात वापरला जाणारा बर्फ अनेकदा अशुद्ध असतो, ज्यामुळे घसा दुखी किंवा जलजन्य आजार होऊ शकतात.
स्वच्छतेची खात्री करा : रसवंतीचालकाने ऊस नीट धुतलेला असल्यास आणि मशीन स्वच्छ असल्यास संसर्गाचा धोका राहत नाही.
आजकाल खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये, अवघ्या १० ते २० रुपयांत उसाचा रस उपलब्ध होतो. कडक उन्हामध्ये हे नैसर्गिक थंडगार पेय म्हणजे सर्वसामान्यांसाठी अमृतासमान आहे. बऱ्याच लोकांना रसात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या शुद्धतेबद्दल शंका असते, त्यामुळे ग्राहक आता बर्फाशिवाय रस पिण्याला जास्त पसंती देत आहेत. रसाची चव वाढवण्यासाठी आम्ही त्यात लिंबू, आले, काळे मीठ आणि जलजीरा मसाला वापरतो, ज्याचा शरीराला फायदाच होतो. -वर्षा पाटील, आकुर्डी, विक्रेता
काविळ आणि गैरसमज
अनेकांचा असा समज आहे की उसाचा रस पिल्याने काविळ होते. मात्र, सत्य हे आहे की अस्वच्छ पाणी किंवा दूषित बर्फामुळे ‘हिपॅटायटीस’चा धोका असतो. स्वच्छ आणि ताजा रस हा उलट यकृताला बळकटी देण्याचे काम करतो. त्यामुळे रसवंतीगृहाबाहेर गर्दी करताना नागरिकांनी स्वच्छतेची खात्री करूनच रसाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून शरीराला दिलासा देण्यासाठी उसाचा रस अत्यंत प्रभावी आहे. उसाच्या रसात नैसर्गिक ‘सुक्रोज’ साखर असल्याने शरीराला त्वरित ऊर्जेचा पुरवठा होतो आणि तहानही शमते. मात्र, आरोग्यदृष्ट्या स्वच्छतेची योग्य काळजी घेणे अनिवार्य आहे. जेथे स्वच्छतेची परिपूर्ण खात्री दिली जाते किंवा तुम्ही स्वतः त्याची खात्री करून घेत असाल, तर बर्फ विरहित ताजा उसाचा रस पिण्यास काहीच हरकत नाही. विशेषतः ज्या ठिकाणी बर्फाच्या शुद्धतेबद्दल शंका असेल, तिथे बर्फ टाळणेच अतिउत्तम ठरते. — डॉ. ललितकुमार धोका, अध्यक्ष, भारतीय वैद्यकीय संघटना






