संग्रहित फोटो
पिंपरी/विजया गिरमे : एकेकाळी राहण्यासाठी उत्तम आणि हवेशीर मानले जाणारे पिंपरी-चिंचवड शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आज ‘जागतिक हवामान दिन’ साजरा होत असताना, शहराची ओळख ‘सर्वाधिक प्रदूषित शहर’ अशी होऊ लागली आहे. धूळ, धूर आणि वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण असून, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत आहेत. वाढते सिमेंट काँक्रिटीकरण, रस्ते-मेट्रोची अपूर्ण कामे आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे शहराचा श्वास कोंडला असून, मार्च महिन्यातच सूर्याची दाहकता असह्य होऊ लागली आहे.
तापमानाचा ‘मार्च’ अटॅक!
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याने लवकरच आपली पावले उमटवली आहेत. एरवी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी उष्णता यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच अनुभवायला मिळत आहे. पुणे वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, चालू महिन्यात तब्बल ८ दिवस कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे.
गेल्या चार वर्षांतील मार्चमधील तापमानाची आकडेवारी :
२०२१ : ४१.५ (२९ मार्च)
२०२२ : ४१.२ (२८ मार्च)
२०२५ : ३९.८ (१८ मार्च)
२०२६ : ३८.९ (१८ मार्च)
पिंपरी-चिंचवड (मार्च २०२६ – सर्वाधिक प्रदूषणाचे दिवस)
सर्वात जास्त प्रदूषण : ११ मार्च – १५४ AQI (हा या महिन्यातील आतापर्यंतचा उच्चांक आहे). पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रदूषणाची सध्याची पातळी (१५४ AQI) किमान ५० ते ८० च्या दरम्यान (समाधानकारक श्रेणी) येणे आवश्यक आहे.
इतर सर्वाधिक प्रदूषणाचे दिवस :
०४ मार्च – १४८ AQI
१२ मार्च – १४८ AQI
०३ मार्च – १४६ AQI
१० मार्च – १४४ AQI
०२ मार्च – १४३ AQI
प्रदूषणाची ‘कारणे’ अनेक, उपाय ‘शून्य’!
शहरात ‘स्वच्छ हवा कार्यक्रम’ कागदावर राबवला जात असला तरी जमिनीवर मात्र स्थिती ‘जैसे थे’ आहे. प्रदूषणाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
धुलीकणांचे साम्राज्य : मेट्रोची कामे आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे हवेत धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
वृक्षतोड व नाममात्र पुनर्रोपण : विकासकामांसाठी जुनी झाडे तोडली जात आहेत, तर पुनर्रोपित केलेल्या झाडांकडे दुर्लक्ष झाल्याने ती मृतावस्थेत आहेत.
वाहनांचा विळखा : सार्वजनिक वाहतुकीच्या कमतरतेमुळे खासगी वाहनांची संख्या वाढली असून धुराचे प्रमाण वाढले आहे.
काँक्रिटीकरण : रस्ते आणि इमारतींच्या अतिवापरामुळे शहरात उष्णता साठून राहते.
लहानग्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
प्रदूषित हवा आणि वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि डिहायड्रेशनच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. शुद्ध हवेसाठी आता नागरिकांना मोर्चे काढण्याची नामुष्की आली असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे सुद्धा वाचा : विमानांद्वारे ड्रग्ज तस्करीचा नवा डाव! बँकॉक टू पुणे रूट उघड; तब्बल…
काय आहे उपाय?
शहरात ‘मियावाकी’ पद्धतीने घनदाट वने उभारणे.
धूळ रोखण्यासाठी रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी आणि यांत्रिक साफसफाई.
नव्याने लावलेल्या रोपांच्या देखभालीसाठी जिओ-टॅगिंग आणि जबाबदारी निश्चिती.
पिंपरी-चिंचवडमध्ये नियमबाह्य वाहतूक, आरएमसी प्लांट्स आणि बांधकामांच्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता (AQI १५०-२००) चिंताजनक झाली आहे. नागरिकांनी सुरू केलेल्या ‘धूळमुक्त पिंपरी-चिंचवड’ अभियानाची महापौरांनी घेतलेली दखल स्वागतार्ह असली, तरी आता केवळ चर्चा नको आहे. प्रशासनाने पडद्याचा वापर न करणाऱ्या वाहनांवर आणि धूलिप्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर दंडात्मक कारवाई करून नियमांची ठोस अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. – सागर वाघ, निसर्गराजा मित्र जिवांचे






