प्राणी संग्रहालयात नीलगाईचा मृत्यू (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात एका मादी नीलगाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. नीलगाईच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक तपासणी सुरू आहे. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूमागील कारण निश्चित करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पैथोलॉजी विभागातील तज्ज्ञांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार नीलगाईच्या शरीरात मोठी गाठ आढळून आली आहे. मात्र या गाठीचे स्वरूप आणि त्याचा मृत्यूशी असलेला संबंध याबाबतची खात्री मिळणाऱ्या सविस्तर अहवालानंतरच होणार आहे. मृत नीलगाय ही ५ फेब्रुवारी २०१२ रोजी जन्मलेली मादी होती. प्राणी संग्रहालयात एकूण १ नर व ५ मादी नीलगायी होत्या. या घटनेनंतर आता १ नर आणि ४ मादी नीलगायी प्राणी संग्रहालयात उरल्या आहेत. अशी माहिती प्राणी संग्रहालयाच्या उपसंचालिका डॉ. सुचित्रा सुर्यवंशी यांनी दिली.
नीलगाय हे कुरंग कुळातील हरीण असून दिसण्यात गाईशी साम्य असल्याने ‘नीलगाय’ हे नाव प्रचलित झाले. इंग्रजीत याला ‘ब्लूबुल’ असे म्हणतात. भारतातील कोरड्या प्रदेशात या प्रजातींचा मुख्य वावर आढळतो. राजस्थान आणि मध्य प्रदेशात यांची संख्या अधिक आहे. गाईसारखे साम्य आणि पवित्रतेची भावना यामुळे या प्राण्यांची शिकार तुलनेने कमी होते.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने तिकिट दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्राणीसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणीसंग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी; ‘असे’ असतील नवीन दर
असे असतील नवीन दर
नवीन दरांनुसार प्रौढांसाठी तिकिट 40 रुपयांवरून 60 रुपये, मुलांसाठी 10 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आले आहे. परदेशी पर्यटकांना 100 ऐवजी 150 रुपये आकारले जातील. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना 20 व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना 10 रुपये शुल्क आकारले जाईल. प्राणीसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माउस डियर, सिंह, माकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे दाखल होणार आहेत. सर्प उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे.






