निसर्ग जपण्याचा आमचा प्रयत्न - प्रसाद गावडे
रानमाणूस फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात प्रसाद गावडे, सत्यजित चव्हाण, अविनाश उषा वसंत, स्वप्नील तोंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सह्याद्री आणि कोकणातील प्रश्नांवर भूमिका मांडली. दुर्गेश काळे यांच्या सुरेल गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश खुटवड यांनी सूत्रसंचालन केले.
Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…
तरुणांना समाजमाध्यमांवरील केवळ ‘स्क्रोलिंग’पुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवरील प्रश्नांशी जोडण्याची गरज गावडे यांनी व्यक्त केली. कोकणाची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे. ‘कोकण सुंदर दिसावे म्हणून नव्हे, तर ते आमचे घर आहे, आम्ही तिथे राहतो म्हणून ते वाचवायचे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाषेवर आधारित शिक्षण देण्यापेक्षा संस्कृती आणि स्थानिक जीवनशैली जपणारे शिक्षण देणे सध्या गरजेचे आहे असेही मत गावडे यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या आसपासच्या सह्याद्रीतील गावांसह कोकणात विकासाच्या नावाखाली होत असलेला ऱ्हास, अतिक्रमणे आणि त्याचा स्थानिक शेतकरी व नागरिकांना बसणारा फटका याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘राखणदार यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. यात्रेचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, आतापर्यंत सुमारे ४० गावांतून प्रवास करून हजारो नागरिकांशी संवाद साधला आहे. यात्रेचा चौथा टप्पा पालघर जिल्ह्यात होणार असल्याची माहितीही स्वप्नील तोंडे यांनी दिली.
सत्यजित चव्हाण यांनी पर्यावरणातील संवेदनशील क्षेत्रांकडे स्थानिकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम घाटातील जैवविविधता जपत विकासकामे करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक असून, स्थानिक प्रजाती, माती, कातळशिल्पे आणि पारंपरिक परिसंस्था जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार; उदय सामंत यांची माहिती
कोकणातील प्रस्तावित मोठ्या प्रकल्पांबाबतही यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक संसाधने आणि गरजा बाजूला ठेवून बाहेरून विकासाचे प्रारूप आणले जाते, तेव्हा त्याचा लाभ नेमका कोणाला होतो, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत चर्चेत व्यक्त करण्यात आले. चर्चासत्राला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.






