जेजूरी गडावर भाविकांची अलोट गर्दी
जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोक दैव असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये सोमवती निमित्त आज सकाळपासूनच भाविक भक्तांनी सोमवती यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी जेजुरीगडावर हजेरी लावण्यास सुरुवात केली. सकाळी ठीक अकरा दरम्यान जेजुरी गडावर मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी,ग्रामस्थ,खांदेकरी मानकरी, भाविक भक्त, त्याचबरोबर महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून आलेले भाविक भक्त गडावर सोमवती पालखी निमित्त हजर होते.
पहाटे भूपाळी, काकड आरती, नित्य पूजा, पार पडल्यानंतर अकरा वाजता उत्सव मूर्तींना विधिवत पालखीमध्ये ठेवण्यात आले.यावेळी जेजुरीचे इनामदार राजाभाऊ पेशवे, सचिन पेशवे, माळवदकर पाटील,खोमणे पाटील, मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त आणि खांदेकरी मानकरी सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कायदा सुव्यवस्था योग्य राहावा यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते. काही पोलीस कर्मचारी खांदेकरींच्या वेशभूषेत दिसून आले. सरकार पेशवे यांनी आदेश देतात खांदेकरांनी “सदानंदाचा येळकोट “येळकोट येळकोट जय मल्हार” असे गर्जना करत पालखी उचलली जमलेल्या लाखो भाविकांनी भंडाराची उधळण केली.
भाविक भक्तांची गडावर मोठी गर्दी उसळली होती. मंदिराला प्रदक्षिणा घालत उत्तर दरवाजाने पालखीने स्नानासाठी कऱ्हा नदीकडे प्रस्थान केले.यावेळी गडाच्या दुतर्फा उभे असलेल्या सर्व भावी भक्तांनी पालखी वर मुक्तहस्ताने भंडाराची उधळीत करत येळकोट येळकोट जय मल्हार नावाचा जयघोष केला. पालखी मुख्य द्वारातून बाहेर पडून नंदी चौकातून गौतमेश्वर मंदिराकडे रवाना झाली. या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
पालखी गावातुन कऱ्हा नदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले भाविक पालखी मार्गावर वेगवेगळ्या ठीकठिकाणी खंडोबा देवाच्या पालखीची वाट पाहत बसलेले दिसून आले पालखी येताच भंडाराची उधळून करत खंडोबाच्या नावाचा जयघोष करत होते. सायंकाळी पालखी करा नदी जवळ पोहोचली रंभाई शिंपिंग घाट या ठिकाणी पालखी पोहचली. मुंबई,नाशिक त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातून भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. सायंकाळी सर्वांचे साक्षीने सहाच्या दरम्यान खंडोबा देवाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नान घालून महाआरती करून पुन्हा हा पालखी सोहळा जेजुरीकडे रवाना झाला.
ठिकठिकाणी भाविक भक्तांसाठी जेवणाची सोय तेथील ग्रामस्थांनी केली होती.काही ठिकाणी भाविक भक्तांनी पाण्याची सोय देखील केली होती. सायंकाळी ग्रामदेवता जानुबाई मंदिर येथे पालखी येऊन विसावली.यावेळी ग्रामस्थांनी व अबालवृद्धांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. रात्री ठीक आठ वाजता पालखीने गडावरती प्रस्थान ठेवले.गावातून पालखी जात असताना अनेक ग्रामस्थांनी पालखीसाठी पायघड्या, फुलांचा सडा,रांगोळ्या काढल्या होत्या भंडाराचे उधळण फटाक्यांच्या आतिषबाजी करत पालखी खंडोबा गडावरमार्गस्थ झाली पालखीने पुन्हा एकदा मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली यावेळी तरुण खांदेकरी आपल्या खंडोबा देवाला खांद्यावर नाचवत उत्साहित दिसून आले . खांदेकरी मानकरी ग्रामस्थ व भाविक भक्त यांना रोजमुरा वाटून सोमवती पालखी सोहळ्याचे सांगता झाली.